'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 09:25 IST2025-12-30T09:21:07+5:302025-12-30T09:25:45+5:30
प्रेमाचा शेवट जेव्हा मृत्यूने होतो, तेव्हा संपूर्ण समाज सुन्न होतो. मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातून अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

AI Generated Image
'प्रेम आंधळं असतं' असं म्हटलं जातं, पण याच प्रेमाचा शेवट जेव्हा मृत्यूने होतो, तेव्हा संपूर्ण समाज सुन्न होतो. मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातून अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने आणि तिच्या २५ वर्षीय प्रियकराने विष पिऊन आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे, प्रेयसीचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे समजताच प्रियकर रुग्णालयातून पळून गेला आणि सकाळी त्याचाही मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला.
घरात कुणी नसताना घेतला टोकाचा निर्णय
समोर आलेल्या माहितीनुसार, गुना येथील रशीद कॉलनीतील रहिवासी २५ वर्षीय गणेशचे शेजारी राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीशी गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. मुलगी अवघी ८ वीत शिकत होती. रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास मुलीचे आई-भाऊ घरी आले असता, मुलगी उलट्या करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांनी तातडीने जिल्हा रुग्णालय गाठले. उपचार सुरू असताना रात्री ९:३० च्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली.
रुग्णालयातून पळाला अन् सकाळी मृतदेह सापडला
लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या या जोडप्याने सोबतच विष घेतल्याचा संशय आहे. मुलगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना गणेश तिथे पोहचला होता. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्याचे ऐकताच तो तिथून पसार झाला. सोमवारच्या पहाटे गणेशचा मृतदेह रशीद कॉलनीमध्येच पडलेला आढळला. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
कुटुंबीयांचे आरोप-प्रत्यारोप
मुलीच्या कुटुंबीयांनी गणेशावर गंभीर आरोप केले आहेत. "गणेश स्वतः विष घेऊन आला होता आणि त्यानेच आमच्या मुलीला विष दिले," असा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे दोन्ही कुटुंबीय एकाच समाजाचे होते आणि मुलगी सज्ञान झाल्यावर त्यांचे लग्न लावून देण्याचे बोलणेही सुरू होते, असे मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले. दुसरीकडे, गणेशच्या भावाने आपल्याला या प्रेमप्रकरणाची काहीही कल्पना नसल्याचे म्हटले आहे.
पोलीस तपासात काय येणार समोर?
कँट पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. विष नक्की कुठून आले आणि या टोकाच्या निर्णयामागे नेमके काय कारण होते, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.