गर्लफ्रेंडकडे गिफ्ट दिलेला स्मार्टफोन मागू लागला, नकार दिल्यावर बॉयफ्रेंडने केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 21:21 IST2022-04-05T21:21:24+5:302022-04-05T21:21:50+5:30
Murder Case : प्रेयसीला मोबाईल त्याला परत करण्यास सांगितले असता प्रेयसीने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीची हत्या केली.

गर्लफ्रेंडकडे गिफ्ट दिलेला स्मार्टफोन मागू लागला, नकार दिल्यावर बॉयफ्रेंडने केली हत्या
झारखंडमधील पाकूरमध्ये मोबाईल परत न केल्याने प्रियकराने प्रेयसीची निर्घृण हत्या केली. हे प्रकरण महेशपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी प्रियकराने प्रेयसीला स्मार्टफोन भेट दिला होता. त्याने प्रेयसीला मोबाईल त्याला परत करण्यास सांगितले असता प्रेयसीने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीची हत्या केली.
पोलिसांनी सांगितले की, मृत मुलगी तिच्या २० वर्षीय प्रियकरासह फुटबॉल सामना पाहण्यासाठी बाहेर गेली होती. मात्र त्यानंतरही ती घरी परतली नाही. त्यानंतर सोमवारी प्रेयसीचा मृतदेह घराजवळील निर्जन ठिकाणी पडलेला आढळून आला. दोघेही गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे मृताच्या नातेवाईकांनी सांगितले. आरोपी अनेकदा मुलीच्या घरी येत असे. मात्र, काही दिवसांपूर्वी आरोपीच्या पालकांनी त्याचे लग्न इतरत्र निश्चित केले होते. तेव्हापासून आरोपी प्रेयसीला भेट दिलेला स्मार्टफोन परत करण्यास सांगत होता. मात्र मुलीने फोन परत करण्यास नकार दिला. रविवारीही याच गोष्टीवरून त्यांच्यात जोरदार वादावादी झाली.
आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली
पोलीस अधिकारी नवनीत अँथोनी हेमब्रम यांनी सांगितले की, आरोपीने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली आहे. फुटबॉलचा सामना पाहून दोघे परत येत असताना त्याने प्रेयसीवर धारदार वस्तूने हल्ला केल्याचे त्याने सांगितले. यात प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर प्रियकर स्मार्टफोन घेऊन पळून गेला. पोलिसांनी आरोपीला कंकरबोना येथून अटक केली आहे आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सदर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.