तो वादावर पडदा टाकण्यासाठी निघाला अन् तिने घात केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 23:17 IST2020-06-27T23:09:57+5:302020-06-27T23:17:23+5:30
सरप्राईसमुळे तीन जीव डावावर : प्रेम कथा नाजूक वळणावर

तो वादावर पडदा टाकण्यासाठी निघाला अन् तिने घात केला
नरेश डोंगरे
नागपूर : खूप दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी तो घरातून बाहेर पडला. घरात रडत कुढत बसलेल्या तिच्या डोक्यात भलतेच होते. त्यामुळे तो घरातून बाहेर पडताच तिने घात केला. तिच्या अविवेकी कृत्यामुळे तीन जिवांच्या वाट्याला जीवन मृत्यूचा संघर्ष आला आहे. मनाचा हिय्या करणारी ही घटना कुण्या चित्रपटातील अर्थात रील नाही, तर रियल स्टोरी आहे.
आरती आणि नसीम या दोघांची आठ वर्षांपूर्वी ओळख झाली. सूत जुळले आणि जाती-धर्माच्या भिंतीला तोडून त्यांनी सात वर्षांपूर्वी निकाह केला. आरती आयेशा बनली. सहा वर्षाचा चिमुकला अन अकरा महिन्याची चिमुकली अशी दोन गोड फुले त्यांच्या प्रेमलतेवर फुलली. गाई म्हशीचे दूध काढून दुधाच्या विक्रीवर या दोघांचा संसार सुरू होता. घरात चणचण होती मात्र गोडवा होता. कोरोनाने त्यांचे आर्थिक आणि कौटुंबिक गणित बिघडवले. दुधाचा धंदा बसला. मात्र ईकडे तिकडे जाऊन बसण्याची, फिरण्याची सोय नव्हती. त्यामुळे जगणे रटाळ झाले. मनोरंजनाचे कोणतेही घरात साधन नव्हते. त्यामुळे लहान सहान कारणावरून भांड्याला भांडी लागू लागली. १५ दिवसांपासून वादाला तोंड फुटले. जगणे कंटाळवाणे झाले त्यामुळे घरात टीव्ही घेऊन या, असे आयेशा म्हणाली. तर, खायला पैसे नाहीत, टीव्ही कशाने घ्यायचा, असा प्रश्न करून नसीम आयेशासोबत वाद घालू लागला. लहान मुलगा इकडे तिकडे टीव्ही पाहायला जाण्यासाठी बघतो. मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या धोक्यामुळे कुणी घरात येऊ देत नाही. त्यामुळे माझ्यासाठी नाही तर मुलांसाठी तरी टीव्ही घ्यायलाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका आयेशाने घेतली. टीव्हीने मनोरंजन करण्याऐवजी वाद वाढवला. तो टोकाला गेला. दोन-तीन दिवसांपासून आदळआपट सुरू झाली गुरुवारी रात्रीही तसेच झाले. त्यामुळे नसीम शुक्रवारी वेगळा विचार करून घराबाहेर पडला.
वादावर पडदा पडावा, रुसलेली बायको, मुले खूष व्हावी, म्हणून नसीमने दोन गाई विकल्या. त्यातून आलेल्या पैशातून नसीम शुक्रवारी सकाळी टीव्ही घ्यायला निघाला. पत्नीला सरप्राइज देऊन खुश करायचे, असे त्यांनी मनोमन ठरवले होते. मात्र अर्ध्यात जाताच त्याला फोन आला. आयेशाने विष घेतले, मुलांनाही दिले, असे फोन करणाऱ्याने सांगितले. त्यामुळे हादरलेला असीम घरी आला. अत्यवस्थ अवस्थेतील पत्नी, मुलांना रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घरून निघताना सरप्राईजच्या भानगडीत न पडता सरळ टीव्ही घ्यायला चाललो, असे सांगितले असते तर हे आक्रीत घडले नसते, असा विचार त्याच्या मनातील अपराधीपणाची भावना तीव्र करत आहे. पत्नी आणि दोन मुले मृत्यूशी झुंजत आहे. त्यामुळे तोही कावराबावरा झाला आहे. सरप्राईजने तीन जीवांना मृत्यूच्या जबड्यात नेऊन ठेवले आहे.
रडारमुळे झाला गेम
घरातील कोंबड्यांना जंतू (पिसवा) झाले होते. ते घालवण्यासाठी नसीमने त्याच्या घरी खूप दिवसांपूर्वी 'रडार -२० ईसी' हे कीटकनाशक आणून ठेवले होते. झाडावरही तो रडारची फवारणी करत होता. आयेशाने याच कीटकनाशकांमुळे पोटच्या दोन मुलांचा आणि स्वतःचा घात करून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा
लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल
हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना
बापरे! आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केली मुलाची हत्या
भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला
नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न
Coronavirus News : कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन केलेल्या युवकाची आत्महत्या