त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 17:37 IST2025-11-17T17:37:02+5:302025-11-17T17:37:33+5:30
पत्नीने आपल्या सरकारी नोकरी करणाऱ्या पतीला घरात कोंडून त्याला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
बिहारच्या कटिहारमध्ये अरगरा चौक मोफरगंज येथे एक थरारक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पत्नीने आपल्या सरकारी नोकरी करणाऱ्या पतीला घरात कोंडून त्याला पेटवून दिल्याचा गंभीर आरोप आहे. आगीच्या भयंकर ज्वाळांमध्ये अडकलेला पती मदतीसाठी जोरजोराने ओरडत होता. त्याचा आवाज ऐकून गावकरी धावले आणि त्यांनी दरवाजा तोडून त्याला वाचवले. या घटनेनंतर आरोपी पत्नी कल्याणी देवीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सरकारी शिक्षकाला घरात कोंडलं अन्...
पंकज पोद्दार असे पीडित पतीचे नाव असून ते उर्दू मध्य विद्यालय शरीफगंज येथे सरकारी शिक्षक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पत्नी कल्याणी देवी हिने संपूर्ण नियोजनाने ही घटना घडवून आणली. पंकज पोद्दार घरात असताना पत्नीने बाहेरून दरवाजा बंद केला आणि घराला आग लावली. अचानक लागलेल्या या आगीच्या ज्वाळा इतक्या वेगाने भडकल्या की, पंकज यांना बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग मिळाला नाही. जीव वाचवण्यासाठी ते मोठ्याने ओरडू लागले.
गावकऱ्यांनी जीव धोक्यात घालून वाचवले!
घरातून धुराचे लोळ आणि आगीच्या उंच ज्वाला पाहून शेजारी आणि गावकरी तात्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न सुरू केला. दरवाजा तोडल्यानंतर आतले दृश्य पाहून सगळ्यांचा थरकाप उडाला. पंकज पोद्दार आगीच्या लपेट्यात होते आणि अत्यंत गंभीररीत्या भाजले होते. शेजाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून त्यांना बाहेर काढले आणि तात्काळ सदर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी पंकज यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे सांगितले असून, सध्या त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
पत्नीच्या भूमिकेवर संशय
या घटनेनंतर गावकरी आणि प्रत्यक्षदर्शींनी आरोपी पत्नी कल्याणी देवी हिच्या वर्तनावर गंभीर संशय व्यक्त केला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आग लावल्यानंतर कल्याणीने स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आपल्या अंगावर पाणी ओतून घेतले. यामुळे, 'आपणसुद्धा आगीतून वाचण्याचा प्रयत्न करत होतो', असे भासवण्याचा तिचा प्रयत्न होता. आगीच्या तीव्रतेमुळे अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी खूप वेळ लागला. या घटनेत घरातील जवळपास सर्व सामान जळून खाक झाले आहे.
४ दिवसांपूर्वीही मारहाण, आता मृत्यूचा कट
स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, ही घटना अचानक झालेल्या रागातून घडली नाही, तर पती-पत्नीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र वाद सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेच्या अवघ्या चार दिवसांपूर्वी कल्याणी देवीने रस्त्यावर आपल्या पतीला मारहाण केली होती. या घटनेची तक्रार पोलिसांपर्यंतही पोहोचली होती. तरीही प्रकरण इतके गंभीर वळण घेईल, याची कोणालाच कल्पना नव्हती.
घटनेची माहिती मिळताच नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने सक्रिय झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपी पत्नी कल्याणी देवीला तात्काळ ताब्यात घेतले आहे. पोलीस तिची कसून चौकशी करत असून, संपूर्ण कट नेमका कसा रचला गेला, याची तपासणी करत आहेत.