गुरांवरील प्रेमापोटी गमवावा लागला जीव; तरूणाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 07:13 PM2021-09-19T19:13:08+5:302021-09-19T19:59:17+5:30

Crime News : दोन शेळ्यांचा फडश्या, एकाच दिवशी तीन घटना 

He had to lose his life because of his love for cattle; Young man killed in tiger attack | गुरांवरील प्रेमापोटी गमवावा लागला जीव; तरूणाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

गुरांवरील प्रेमापोटी गमवावा लागला जीव; तरूणाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देअनिल पांडुरंग सोनुले (३६) या तरूणावर पट्टेदार वाघाने हल्ला करुन जागीच ठार केले.

दिलीप मेश्राम

नवरगाव(चंद्रपूर) : सिंदेवाही तालुक्यातील खांडला जवळील खरकाळ नाला परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या अनिल पांडुरंग सोनुले (३६) या तरूणावर पट्टेदार वाघाने हल्ला करुन जागीच ठार केले. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पिपर्डा बिटातील कक्ष क्रमांक ५६३ मध्ये घडली.
         

सर्वञ वाघाचा धुमाकूळ असल्याने खांडला येथील गुरे चारणे गुराख्याने बंद केले. मात्र घरी गुरे असल्याने ते राखण्याचा प्रश्न गावकऱ्यांसमोर निर्माण झाला. त्यामुळे खांडला वासीयांनी मिटींग घेऊन आळीपाळीने रोज गावातील तीन माणसे गुरे चारण्यासाठी जातील, असे ठरल्याने अनिल पांडुरंग सोनुले, गजानन कुंभरे आणि विलास कुंभरे असे तीन व्यक्ती रविवारची पाळी असल्याने गुरे चारण्यासाठी गेले होते. खांडला गावापासून तीन किमी अंतरावरील पळसगांव रेंजमधील पिपर्डा बिटात खरकाळ नाला परिसरात तिघेजण तीन भागात गुरे चारत होते. अनिल उन्हामुळे पळसाच्या झाडाखाली बसला असताना अचानक पट्टेदार वाघाने हल्ला केला. त्यानंतर सुमारे ३० मिटरपर्यंत ओढत नेले. ओढत नेत असताना सोबत असलेल्या गजानन कुंभरे यांचे लक्ष जाताच त्यांनी आरडाओरडा करणे सुरू केले. अखेर अनिलला तिथेच सोडून वाघाने धूम ठोकली. या घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. 
         

या घटनेपूर्वी खांडला जंगलातील वाघडोह परिसरात पट्टेदार वाघाने शेळीवर हल्ला करुन जागीच ठार केले. घटना माहिती होताच रत्नापूर बिटाचे वनरक्षक जे. एस. वैद्य व इतर पाच व्यक्ती पंचनाम्यासाठी गेले असता वाघ तिथेच बसून होता. शेवटी खांडला येथील गावकऱ्यांना घटनास्थळी बोलाविल्यानंतर वाघ तिथून निघून गेला. ही घटना दुपारी २ च्या सुमारास घडली.
         

आणखी रविवारी खांडला गावापासून दोन किमी अंतरावर सरांडी येथे वाघाने हल्ला करून सदाशीव मोहुर्ले यांची शेळी ठार केली. ही घटना २.३० वाजताच्या सुमारास घडली. तीनही घटनास्थळ जवळपास असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे वनविभागाने सदर वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी खांडला केली आहे. अनिलच्या मृत्यूपश्च्यात पत्नी, मुलगा व मुलगी असून तो घरातील कमावता व्यक्ती होता.
                          
महिला वनरक्षकांनी नदी ओलांडून गाठले घटनास्थळ

घटनास्थळ पिपर्डा बिटात असून येथे येण्यासाठी उमा नदी पडते. शिवाय नदीला साडेतीन ते चार फुट पाणी वाहात आहे. मात्र वाघाने माणसाला मारले असल्याने प्रथम घटनास्थळी पोहचणे हे आपले कर्तव्य समजून पिपर्डा बिटाच्या वनरक्षक सीमा ठाकरे यांनी उमा नदीच्या पाण्यातूनन वाट काढत घटनास्थळ गाठले.

Web Title: He had to lose his life because of his love for cattle; Young man killed in tiger attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.