hathras accused sandip svae victim brother number as sanitizer in mobile | Hathras Gangrape : हाथरस प्रकरणात 'नवा ट्विस्ट', आरोपीने पीडितेच्या भावाचा नंबर 'या' नावाने केला होता सेव्ह

Hathras Gangrape : हाथरस प्रकरणात 'नवा ट्विस्ट', आरोपीने पीडितेच्या भावाचा नंबर 'या' नावाने केला होता सेव्ह

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील हाथरसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणाची वेगाने चौकशी सुरू आहे. तपासासोबतच आता कुटुंबाला सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तपासादरम्यान या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पुन्हा एकदा हाथरस प्रकरणात 'नवा ट्विस्ट' आला आहे. पीडित तरुणीचे कुटुंबीय आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी हे फोनच्या माध्यमातून सातत्याने एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती याआधी समोर आली होती. मात्र आता आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

चंदपा परिसरातील गावात सामूहिक बलात्कार प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप याने आपल्या मोबाईलमध्ये पीडितेच्या भावाचा फोन नंबर हा "सॅनिटायझर" या नावाने सेव्ह केल्याची नवी माहिती आता समोर आली आहे. कोरोनाच्या संकटात सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून त्याचीच अनेकदा चर्चा असते. मात्र आता आरोपीने पीडितेच्या भावाचा मोबाईल नंबर सॅनिटायझर या नावाने सेव्ह करून ठेवल्याने याची अधिक चौकशी सुरू आहे. 

"पोलीस माझ्या बहिणीचं चारित्र्यहनन करताहेत, गरीब असल्याने फसवण्याचा प्रयत्न"

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पीडित कुटुंब आणि आरोपीमध्ये तब्बल 104 वेळा संभाषण झाले होते, असा दावा उत्तर प्रदेशपोलिसांनी केला आहे. यानंतर आता पोलीस माझ्या बहिणीचं चारित्र्यहनन करत आहेत असा आरोप पीडितेच्या भावाने केला आहे. पीडितेच्या मोठ्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, "हा आमच्याविरोधात रचलेला कट आहे. मारेकरी अतिशय चलाख आहेत. स्वत:ला वाचवण्यासाठी ते काहीही करू शकतात. 10 वर्षांपूर्वी आपण वडिलांसाठी एक सिम विकत घेतलं होतं मात्र त्यांचा फोन नेहमी हरवायचा. यासाठी आपण आपल्या आयडीने सिम विकत घेतलं. हा फोन नेहमीच घरीच असतो. गावातील सर्वांकडे, इतकेच काय पण ग्रामप्रमुखांकडेदेखील आमचा हा एकच नंबर आहे. या फोनचा उपयोग अधिकतर वडीलच करतात. मात्र मुख्य आरोपी संदीपशी कधीही संपर्क केला नाही."

"हा आमच्याविरोधात रचलेला कट", पीडितेच्या कुटुंबीयांना केले गंभीर आरोप, म्हणाले...

पोलीस माझ्या बहिणीचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पीडितेच्या मोठ्या भावाने केला आहे. आम्ही नेहमीच बहिणीवर नजर ठेवून असायचो. मला माझ्या बहिणीवर कोणताही संशय नाही असं देखील म्हटलं आहे. तसेच माझी बहीण शिकलेली नव्हती. तिला फोन नंबर देखील डायल करता येत नव्हता. तिला फोन उचलता देखील यायचा नाही अशी माहिती पीडितेच्या छोट्या भावाने दिली आहे. पीडितेचा छोटा भाऊ गाझियाबाद येथे काम करतो. त्याने पोलिसांच्या या दाव्याबाबत पुराव्याची मागणी केली आहे. 

"उत्तर प्रदेश पोलीस आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण आम्ही गरीब आहोत. आमच्यावरील अत्याचाराला शेवट नाही. जर त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे, तर मग पुरावे देखील असतीलच. मला ती कॉल रेकॉर्डिंग ऐकायची आहे" असं भावाने म्हटलं आहे. कॉल डीटेल रेकॉर्ड (CDR) डाक्युमेंट्समध्ये एकच नंबरची वेळ, कालावधी, लोकेशन आणि कॉलची संख्या नमूद आहे. या प्रकरणाचा तपास करताना उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपी आणि पीडित कुटुंबाचा कॉल रेकॉर्ड तपासला तेव्हा दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्यावर्षी 13 ऑक्टोबरपासून सातत्याने संपर्क असल्याचे समोर आले. तसेच यापैकी बहुतांश कॉल हे चंदपा येथून करण्यात आले असे दिसून आले. या परिसर पीडितेच्या गावापासून केवळ दोन किमी अंतरावर आहे.

Web Title: hathras accused sandip svae victim brother number as sanitizer in mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.