"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:20 IST2025-10-09T11:19:44+5:302025-10-09T11:20:14+5:30
हरियाणा कॅडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांनी चंदीगडमधील त्यांच्या घराच्या बेसमेंटमध्ये स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या.

"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
७ ऑक्टोबर रोजी हरियाणा कॅडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांनी चंदीगडमधील त्यांच्या घराच्या बेसमेंटमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेच्या एक दिवस आधी ६ ऑक्टोबर रोजी त्यांनी एक मृत्युपत्र तयार केलं होतं, ज्यामध्ये त्यांची सर्व जंगम आणि स्थावर मालमत्ता त्यांची पत्नी आणि वरिष्ठ आयएएस अधिकारी अमनीत पी. कुमार यांच्या नावावर करण्यात आली. त्यांनी नऊ पानांची एक सुसाईड नोट देखील लिहिली होती, जी त्यांनी त्यांच्या पत्नीला पाठवली होती.
आयएएस पत्नी अमनीत पी. कुमार मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यासोबत सरकारी दौऱ्यासाठी जपानमध्ये होत्या. पूरन कुमार यांनी सुसाईट नोट पाठवल्यानंतर, अमनीत पी. कुमार यांनी त्यांना १५ वेळा फोन केला, परंतु एकही कॉल रिसिव्ह करण्यात आला नाही. घाबरून अमनीत यांनी त्यांची छोटी मुलगी अमूल्या हिला तिच्या वडिलांकडे ताबडतोब जाण्यास आणि त्यांच्याशी बोलण्यास सांगितलं. आईच्या फोननंतर अमूल्या घरी आली तेव्हा तिला तिचे वडील बेसमेंटच्या सोफ्यावर पडलेले आढळले, त्यांच्या डोक्यातून रक्त येत होतं.
पत्नी वारंवार करत होती फोन
घरातील कुक प्रेम सिंग यांनी सांगितलं की, सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पूरन कुमार म्हणाले होते की, ते बेसमेंटमध्ये जात आहेत आणि त्यांना डिस्टर्ब करू नका असं सांगितलं होतं. ते त्या दिवशी त्यांच्या पाळीव कुत्र्यालाही फिरायला घेऊन गेले नाहीत. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास, ते थोड्या वेळासाठी वरच्या मजल्यावर आले आणि जेवण मागितलं, नंतर परत बेसमेंटमध्ये गेले. याच दरम्यान, त्यांची पत्नी त्यांना वारंवार फोन करत होती, पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
सुसाईड नोटमुळे खळबळ
पूरन कुमार यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या नऊ पानांच्या सुसाईड नोटमुळे पोलीस आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी १५ वरिष्ठ आणि माजी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांवर जातीय भेदभाव, मानसिक छळ आणि सार्वजनिक अपमानासह गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये हरियाणाचे मुख्य सचिव अनुराग रस्तोगी, डीजीपी शत्रुजीत कपूर आणि माजी मुख्य सचिव टी.व्ही.एस.एन. यांचा समावेश आहे.
"कधीही भरून न येणारे नुकसान"
सुसाईड नोटमध्ये, शत्रुजीत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना वारंवार अपमानास्पद पोस्टिंग देण्यात आल्या, त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि खोट्या खटल्यांमुळे ते मानसिकरित्या खूप खचले. त्यांनी सांगितले की मंदिरांना भेट दिल्याबद्दल देखील त्यांना टार्गेट करण्यात आले आणि त्यांच्या वडिलांच्या मृत्यूपूर्वी त्यांना रजा नाकारण्यात आली, ज्याचे वर्णन त्यांनी "कधीही भरून न येणारे नुकसान" असं केलं.