"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 16:50 IST2025-12-21T16:46:03+5:302025-12-21T16:50:43+5:30
एका ३० वर्षीय महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली.

"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
हरियाणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ३० वर्षीय महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत महिलेच्या माहेरच्या लोकांनी पती आणि सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ आणि विष देऊन हत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
भगवानपूर गावचे रहिवासी नवाब यांनी सांगितलं की, त्यांची बहीण समीनां २०१६ मध्ये कोतरखाना येथील जुलफान याच्याशी लग्न झालं होतं. लग्नानंतर काही दिवसांपासूनच सासरच्या मंडळींकडून समीनाचा हुंड्यासाठी छळ केला जात होता. नवाब यांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबाने अनेकदा सासरच्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला पण परिस्थिती बदलली नाही.
दोन मुलांची आई असलेली समीना सतत मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करत होती. शुक्रवारी सकाळी समीनाने आपल्या आईला फोन केला. तिने रडत रडत सांगितलं की, सासरचे लोक तिला मारहाण करत आहेत आणि त्यांनी तिला जबरदस्तीने काहीतरी विषारी पदार्थ खाऊ घातला आहे, ज्यामुळे तिची प्रकृती खालावत आहे.
आईशी बोलत असतानाच समीनाचा पती तिथे आला आणि त्याने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर संपर्क तुटला. काही वेळाने समीनाला उपचारासाठी अग्रसेन चौकातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती तिच्या माहेरच्यांना मिळाली. नातेवाईक रुग्णालयात पोहोचले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
घटनेची माहिती मिळताच छप्पर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी सांगितलं की, शवविच्छेदन करण्यात आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. सध्या पोलिसांनी नातेवाईकांचे जबाब नोंदवून घेतले असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.