हातातील बेड्यासकट चाेरटा पाेलीस ठाण्यातून पळाला, सर्वांचीच उडाली धांदल
By अरुण आडिवरेकर | Updated: November 12, 2022 22:00 IST2022-11-12T21:59:38+5:302022-11-12T22:00:29+5:30
काेकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हाताेहात गंडा घालून त्यांचे किंमती साहित्य चाेरुन नेण्याचे प्रकार वाढले आहेत

हातातील बेड्यासकट चाेरटा पाेलीस ठाण्यातून पळाला, सर्वांचीच उडाली धांदल
रत्नागिरी : रेल्वेत प्रवाशांना गंडा घालणाऱ्या सराईत चाेरट्याला रेल्वे पाेलिसांनी शनिवारी (१२ नाेव्हेंबर) पहाटे अटक केली. त्याला शहर पाेलीस स्थानकात आणले असता दुपारी बाथरुमला जाण्याच्या बहाण्याने हातातील बेडीसकट पाेलीस स्थानकाच्या बांधावरुन उडी मारुन पळ काढला. दत्तात्रय शिवाजी गाेडसे (रा. साेलापूर) असे या चाेरट्याचे नाव आहे.
काेकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हाताेहात गंडा घालून त्यांचे किंमती साहित्य चाेरुन नेण्याचे प्रकार वाढले आहेत. याप्रकरणी रत्नागिरी शहर पाेलिसांनी चाेरट्याला यापू्र्वी अटक केली हाेती. ताे जामिनावर सुटल्यावर पुन्हा चाेरींचे प्रमाण वाढले हाेते. खेड रेल्वे स्थानका दरम्यान काही दिवसांपूर्वी लाखाे रुपयांची चाेरी झाली हाेती. या चाेरीत दत्तात्रय शिवाजी गाेडसे याचा हात असावा, असा पाेलिसांना संशय हाेता. त्यानुसार पाेलीस त्याच्या मागावर हाेते.
रेल्वे पाेलिसांनी शनिवारी (१२ नाेव्हेंबर) पहाटेच्या सुमाराला दत्तात्रय गाेडसे याला अटक केली. त्याला शहर पाेलीस स्थानकात आणण्यात आले. मात्र, रेल्वे पाेलीस तक्रार द्यायला तयार नव्हते. ज्यांनी आराेपीला पकडला त्यांनी तक्रार देणे क्रमप्राप्त हाेते. पण, ते तयार नव्हते, तक्रार द्यायची काेणी यावर दुपारपर्यंत चर्चा सुरु हाेती. ताेपर्यंत संशयित चाेरट्याच्या हातात बेडी घालून त्याला बंद खाेलीत बसवून ठेवण्यात आले हाेते. दुपारच्या सुमाराला लघुशंका आल्याचे त्याने रेल्वे पाेलिसांना सांगितले. त्यानुसार रेल्वे पाेलीस त्याला बाथरुमला घेऊन गेले. बाथरुमला नेत असतानाच त्याने रेल्वे पाेलिसांच्या हाताला झटका दिला आणि बांधावरुन उडी मारुन पळून गेला. सराईत चाेरटा पळून जाताच रेल्वे पाेलिसांची धावपळ उडाली. त्यांनी आराेपी पळाल्याची माहिती शहर पाेलिसांना दिली. त्यानंतर शहर पाेलिसांचीही धावपळ उडाली.