वाळू माफियांचा कहर; कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारावर घातले ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 13:40 IST2019-12-14T13:38:08+5:302019-12-14T13:40:07+5:30
गंभीर जखमी तहसीलदारांवर बार्शी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाळू माफियांचा कहर; कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारावर घातले ट्रॅक्टर
परंडा (जि. उस्मानाबाद) : शहरालगत भोत्रा रस्त्यावर सीना नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर परंडा तहसीलदार अनिलकुमार हेळकर हे कारवाईसाठी गेले होते. यावेळी वाळूमाफियाने त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. या घटनेत हेळकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर बार्शी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सध्या परंडा शहर व तालुका परिसरात असलेल्या नदीपात्रातून वाळू माफियांकडून अवैधरित्या बेसुमार वाळूचा उपसा सुरू आहे. शनिवारी पहाटे तहसीलदार हेळकर यांना बेकायदा सीना नदीपोातून वाळू चोरी होत असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार हेळकर हे तलाठी चंद्रकांत कसाब, अशिष ठाकूर, आकाश बाबळे या महसूल कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कारवाईसाठी गेले. यावेळी अण्णा खडके यांच्या खडीकेंद्रावर वाळू भरलेले ट्रॅक्टर दिसून आल्याने हेळकर यांनी वाहनाजवळ जावून चावीची मागणी केली. तेव्हा ट्रॅक्टर चालक मयूर बापूसाहेब वाघमारे (रा. परंडा) याने तहसीलदार हेळकर यांच्या अंगावरच ट्रॅक्टर घातला. यावेळी ट्रॅक्टरचे मोठे चाक हेळकर यांच्या पाठीवरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक इक्बाल सय्यद, सपोनि रावसाहेब राठोड हे सहाकारी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तहसीलदार हेळकर यांना तत्काळ उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात हलविले. दरम्यान, यानंतर उपविभागीय अधिकारी मनिषा राशीनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खोंदे यांनीही घटनास्थळी भेट दिली.