दुधात गोळ्या टाकून बेशुद्ध केलं अन्... मुलीची मागणी कुटुंबाला पचवता आली नाही, केलं भयंकर कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 14:01 IST2025-08-13T14:01:31+5:302025-08-13T14:01:58+5:30
गुजरातमध्ये उच्च शिक्षणाला विरोध करत कुटुंबाने १८ वर्षीय मुलीची निर्घृणपणे हत्या केली.

दुधात गोळ्या टाकून बेशुद्ध केलं अन्... मुलीची मागणी कुटुंबाला पचवता आली नाही, केलं भयंकर कृत्य
Gujarat Crime:गुजरातमधून ऑनर किलिंगची एक हादरवणारी घटना समोर आली आहे. गुजरातमधील बनासकांठा येथील १८ वर्षीय चंद्रिका चौधरीच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला. चंद्रिकाचा मृत्यू हा अपघात दाखवण्याचा प्रयत्न झाला पण तो सुनियोजित खून होता. हृदयविकाराच्या झटक्याने चंद्रिकाचा मृत्यू झाल्याचे सुरुवातीला सांगण्यात आलं होतं. मात्र तपासानंतर तिच्या वडिलांनी आणि काकांनीच मिळून तिला संपवल्याचे समोर आलं. महत्त्वाचे म्हणजे घाईघाईत तिचे अंत्यसंस्कारही करण्यात आले होते.
बनासकांठा येथील १८ वर्षीय चंद्रिका, जी एमबीबीएसची तयारी करत होती. चंद्रिका चौधरीने नीट परीक्षेत ४७८ गुण मिळवले होते. त्यानंतर ती सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी पात्र ठरली. तिला पुढे शिक्षण सुरू ठेवायचे होते पण कुटुंबाने चंद्रिकाची मागणी फेटाळून लावली होती. कुटुंबाची जुनी विचारसरणी आणि संकुचित वृत्ती चंद्रिकाच्या करिअरच्या मध्ये आले. कुटुंबाला भीती होती की जर चंद्रिका बाहेर शिकण्यासाठी गेली तर ती एका मुलाच्या प्रेमात पडेल आणि स्वतःच्या इच्छेने त्याच्याशी लग्न करेल. त्यामुळेच त्यांनी चंद्रिकाला संपवण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रिकाला हृदयविकाराचा झटका आला नव्हता. तर हे पूर्वनियोजित 'ऑनर किलिंग'चे प्रकरण होते. तपासात तिच्या वडिलांनी आणि काकांनी तिला मारले. २५ जून रोजी चंद्रिका चौधरीला तिचे वडील सेंधा यांनी बेशुद्धीच्या गोळ्या मिसळलेले दूध पाजले आणि नंतर त्यांनी आणि तिचे काका शिवराम यांनी ओढणीने गळा दाबून हत्या केली. शिवरामने काही गावकऱ्यांना सांगितले की चंद्रिकाला हृदयविकाराचा झटका आला होता.
गुजरात उच्च न्यायालयात चंद्रिकाचा जोडीदार हरेश चौधरीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होण्याच्या दोन दिवस आधीच तिला तिच्या कुटुंबाने मृत घोषित केले होते. चंद्रिकाला हरीशसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचे होते आणि ती डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत होती. पण तिच्या कुटुंबाला हे मान्य नव्हते. शिवराम काही कॉलेजमध्ये गेला होता आणि त्याने मुला-मुलींना एकत्र शिकताना पाहिले होते. त्याने चंद्रिकाच्या वडिलांना सांगितले होते की तिला कॉलेजमध्ये पाठवू नका कारण ती एका मुलाच्या प्रेमात पडेल आणि त्याच्याशी लग्न करेल.
फेब्रुवारीमध्ये चंद्रिका पहिल्यांदा हरिशला भेटली होती. दूधाचा ग्लास देण्यापूर्वी चंद्रिकाने तिच्या वडिलांकडून दूध पी आणि चांगली विश्रांती घे असे शब्द ऐकले होते. चंद्रिकाच्या हत्येच्या दोन आठवड्यांपूर्वीच या जोडप्याने लिव्ह-इन करारावर स्वाक्षरी केली होती. तिला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे आहे. आम्ही कोणालाही इजा करत नव्हतो. आम्हाला फक्त शांततेत राहायचे होते, असं हरीशने सांगितले.