"बहिणीशी विश्वासघात करणार नाही"; तीन मुलांच्या बापाला मेहुणीशी करायचं होतं लग्न; नकार मिळताच दोघांना संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 16:21 IST2025-10-10T16:21:33+5:302025-10-10T16:21:56+5:30
गुजरातमध्ये मेहुणीच्या प्रेमात वेड्या झालेल्या जावयाने बहिण भावाची निर्घृणपणे हत्या केली.

"बहिणीशी विश्वासघात करणार नाही"; तीन मुलांच्या बापाला मेहुणीशी करायचं होतं लग्न; नकार मिळताच दोघांना संपवलं
Gujarat Crime: गुजरातमध्ये बहीण आणि भावाच्या हत्येने खळबळ उडाली आहे. गुजरातच्या सूरतमध्ये एका व्यक्तीने त्याच्या मेहुणी, मेहुणा आणि सासूवर निर्घृणपणे हल्ला केला. या हल्ल्यात मेहुणा आणि मेहुणीचा मृत्यू झाला, तर सासू जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे. सूरतमधल्या या आरोपीला त्याच्या २० वर्षांच्या मेहुणीसोबत लग्न करायचे होते. पत्नी आणि तीन मुले असूनही, तो तिच्या प्रेमात पडला होता. ती त्याच्याशी लग्न करेल या आशेने तो तिला अश्लील व्हिडिओ आणि अश्लील मेसेजही पाठवायचा असे. पण मेहुणीचे त्याच्यावर प्रेम नव्हते. याचाच संताप आल्याने बहिणीच्या नवऱ्याने मेहुणी आणि मेहुण्याला संपवून टाकलं.
मृत भाऊ आणि बहीण त्यांच्या आईसह चार दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून सुरत येथे भावाच्या लग्नासाठी कपडे खरेदी करण्यासाठी आले होते. प्राथमिक पोलिस तपासात मोठ्या बहिणीच्या पतीला त्याच्या मेहुणीशी लग्न करायचे होते. या वादातून त्याने सासू, मेहुणी आणि मेहुण्यावर हल्ला केला. हल्यानंतर आरोपी घरातून पळून गेला. सुरत शहरातील उधना पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पटेल नगर परिसरातील साई जलाराम सोसायटीमधील एका घरात बुधवारी रात्री हे हत्याकांड घडले. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.
पत्नी आणि मुलांसह तिथे राहणाऱ्या ३४ वर्षीय संदीप घनश्याम गौरने त्याच्याच मेहुणी आणि मेहुण्याची हत्या करुन पळ काढला. लग्नाच्या खरेदीसाठी मेहुणी, मेहुणा आणि सासू मोठ्या मुलीच्या घरी आले होते. ८ ऑक्टोबर रोजी बहिणीच्या पतीने अचानक एक मागणी केली. "मला माझ्या मेहुणीशी लग्न करायचे आहे." हे ऐकून सगळेच स्तब्ध झाले. त्यानंतर घरात जोरदार वाद झाला आणि त्यातून हाणामारी झाली. बहिणीचा पती इतका संतापला की त्याने मेहुणी आणि मेहुण्याची हत्या केली. त्याने आपल्या सासूलाही गंभीर जखमी केले.
संदीप घनश्याम गौर याचा मेहुणा निश्चय अशोक कश्यप, बहीण ममता कश्यप आणि आई शकुंतला देवी यांच्यासह ४ ऑक्टोबर २०२५ रोजी लग्नाच्या खरेदीसाठी प्रयागराजहून सुरतला आले होते. बुधवारी रात्री उशिरा संदीप गौरने सासूकडे ममतासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मला माझ्या मेहुण्याशी लग्न करायचे आहे, असं त्याने उघडपणे म्हटलं. संदीपची मागणी ऐकून सासूला धक्का बसला. जर ममता माझी झाली नाही तर मी तिला दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही, अशीही धमकी त्याने दिली. ममतानेही मी माझ्या बहिणीचा विश्वासघात करू शकत नाही. मी तुझ्याशी लग्न करणार नाही, असं सांगून टाकले. याचाच राग संदीपला आला. त्याने रागाच्या भरात ममता, निश्चय आणि सासूवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात ममता आणि निश्चयचा जागीच मृत्यू झाला. तर सासूला रुग्णालयात दाखल करण्यात आले.