"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 16:39 IST2025-07-19T16:38:40+5:302025-07-19T16:39:34+5:30
ज्योतीने मृत्यूसाठी दोन प्राध्यापकांना जबाबदार धरलं. आता या दोन्ही प्राध्यापकांना निलंबित करण्यात आलं आहे.

फोटो - tv9 भारतवर्ष
गुरुग्राममधील अशोक विहार येथील रहिवासी ज्योती ही ग्रेटर नोएडा येथील शारदा विद्यापीठात बीडीएसची विद्यार्थिनी होती. शुक्रवारी ज्योतीने गर्ल्स हॉस्टेलमधील तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे, ज्यामध्ये ज्योतीने तिच्या मृत्यूसाठी दोन प्राध्यापकांना जबाबदार धरलं. आता या दोन्ही प्राध्यापकांना निलंबित करण्यात आलं आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
"सॉरी, मी आता आणखी जगू शकत नाही. त्यांनी मला मानसिक त्रास दिला, माझा अपमान केला. त्यांच्यामुळे मी बराच काळ डिप्रेशनमध्ये आहे..." असं ज्योतीने तिच्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. "जर मी मेले तर पीसीपी आणि डेंटल मेडिकलचे शिक्षक यासाठी जबाबदार असतील. माझ्या मृत्यूसाठी महेंद्र सर आणि शेरी मॅम जबाबदार आहेत."
"मला वाटतं की त्यांनी जेलमध्ये जावं. त्यांनी मला मानसिक त्रास दिला, माझा अपमान केला. त्यांच्यामुळे मी बऱ्याच काळापासून डिप्रेशनमध्ये आहे. त्यांनाही माझासारखच हे सर्व सहन करावं लागू दे. सॉरी, मी आता आणखी जगू शकत नाही" असं ज्योतीने म्हटलं आहे. या घटनेनंतर कुटुंब आणि विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि न्यायाची मागणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी ज्योती खोलीत एकटी होती. ७ वाजता एक विद्यार्थी आली. तिने पाहिलं तेव्हा खोलीचा दरवाजा आतून बंद होता. विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितलं की, तिने दोनदा ढकलल्यानंतर दरवाजा उघडला. जेव्हा तिने पाहिलं तेव्हा ज्योतीने गळफास घेतला होता. तिने वॉर्डन आणि इतर विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी सांगितलं की, "ज्योतीवर खोटी सही केल्याचा आरोप होता, ज्यामुळे ती खूप अस्वस्थ होती. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी तिला सलग तीन दिवस पीसीपी (प्री क्लिनिकल प्रोस्थोडोंट) विभागातून बाहेर काढलं. फाईल एचओडीला देण्यात आली. त्यानंचर एचओडीने पालकांना बोलवायला सांगितलं.तिचे पालक आल्यावर तिला फाईल मिळाली. शुक्रवारी ती खूप रडत होती. तिला नापास करण्याची धमकी दिली जात होती."