बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 14:32 IST2025-08-24T14:31:28+5:302025-08-24T14:32:41+5:30
ग्रेटर नोएडामध्ये हुंड्यासाठी पत्नी निक्कीला जाळून मारणाऱ्या पती विपिनचा एन्काउंटर करण्यात आला आहे.

फोटो - आजतक
ग्रेटर नोएडामध्ये हुंड्यासाठी पत्नी निक्कीला जाळून मारणाऱ्या पती विपिनचा एन्काउंटर करण्यात आला आहे. एन्काउंटरमध्ये आरोपी विपिनच्या पायाला गोळी लागली. तो पोलिसांच्या ताब्यात असताना पळून जाण्याचा प्रयत्न करत होता असं सांगितलं जातं. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला पण विपिन थांबला नाही. त्यानंतर पोलिसांनी गोळी झाडली जी विपिनच्या पायाला लागली. सध्या त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी पोलीस टीम आरोपीला थिनरची बाटली जिथून घेतली होती तिथून ती परत आणण्यासाठी घेऊन जात होते. याच दरम्यान विपिनने पोलिसांकडून पिस्तूल हिसकावून घेतलं आणि पळू लागला. त्यानंतर पोलिसांनी गोळी झाडली आणि गोळी त्याच्या पायाला लागली.
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
एनकाउंटरनंतर निक्कीच्या वडिलांनी आज तकशी संवाद साधला. ते म्हणाले की, पोलिसांनी योग्य काम केलं, गुन्हेगार नेहमीच पळून जाण्याचा प्रयत्न करतो. विपिन देखील गुन्हेगार आहे. आम्ही पोलिसांना इतरांनाही पकडण्याची आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची विनंती करतो.
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
निक्कीचे वडील भिखारी सिंह म्हणाले की, आधी हुंड्यात स्कॉर्पिओ देण्यात आली, नंतर विपिन आणि त्यांच्या कुटुंबाने बुलेट मागितली. तीही मागणी आम्ही पूर्ण केली. तरीही सासरच्यांनी निक्कीचा छळ सुरूच ठेवला. माझ्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. भिखारी सिंह यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, योगी सरकार आहे, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवला पाहिजे. जर असं झालं नाही तर आम्ही उपोषण करू.
या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये निक्कीचा ६ वर्षांचा मुलगा म्हणत आहे की, पप्पांनी मम्मीला लाईटरने जाळून मारलं. निक्कीच्या मृत्यूनंतर परिसरात संताप आहे. कुटुंबाचा आरोप आहे की निक्की आणि कांचनच्या लग्नापासून सासरच्यांनी पैसे आणि महागड्या वस्तूंची मागणी केली होती.