गुगलमधील कर्मचारी महिलेची आत्महत्या, की...?; मृत्यूभोवतीचं गूढ वाढलं
By पूनम अपराज | Updated: January 25, 2021 18:09 IST2021-01-25T18:08:32+5:302021-01-25T18:09:25+5:30
Murder Or Suicide : भावाने स्वातीचा खून केला असल्याचा आरोप केला आहे. तर पोलिसांचं म्हणणं आहे की, सासरी स्वातीने आत्महत्या केली.

गुगलमधील कर्मचारी महिलेची आत्महत्या, की...?; मृत्यूभोवतीचं गूढ वाढलं
कोलकाता येथे राहणारी स्वाती एक एचआर एक्सिक्युटीव्ह होती. १९ जानेवारी रोजी मयूर विहार परिसरात राहणाऱ्या स्वातीच्या भावाला स्वातीच्या शेजाऱ्यांनी तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती दिली. घाबरलेल्या अवस्थेत स्वातीचा भाऊ अनिरुद्ध दिल्लीला पोहचला. कोलकाताहून दिल्लीला पोहचून भाऊ आपल्या बहिणीच्या मृत्यूचा तपास करून न्याय मिळवू इच्छित आहे. भावाने स्वातीचा खून केला असल्याचा आरोप केला आहे. तर पोलिसांचं म्हणणं आहे की, सासरी स्वातीने आत्महत्या केली.
स्वातीचा भाऊ अनिरुद्ध शर्माने शनिवारी लेखी तक्रार पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. पीडित भावाचा आरोप आहे की, हुंड्यासाठी सासरच्या मंडळीने स्वाती शर्माची हत्या केली. दरम्यान, पोलिसांचं म्हणणं आहे की, स्वातीने घरी आत्महत्या केली. पूर्व दिल्लीच्या एसडीएम असलेल्या अनिरुद्ध शर्मा यांचा जबाब नोंदवून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.
मृत स्वाती शर्मा सिंगापूरच्या गुगल कंपनीमध्ये एचआर पदावर काम करत होती. २०१९ साली मऊ जिल्ह्यात राहणारी हर्षवर्धन त्रिपाठीसोबत स्वातीचा प्रेमविवाह झाला. हर्षवर्धनच्या आईवडिलांचा या लग्नास विरोध होता. लग्नानंतर स्वाती नवऱ्यासोबत सिंगापूरला गेली होती. तेथे दोघांत भांडण होऊ लागले. स्वातीच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, सासरची मंडळी स्वातीवर दिल्लीत फ्लॅट खरेदी करून देण्यासाठी दबाव आणत होते.
पती पत्नीच्या भांडणांमध्ये लॉकडाऊन सुरु झाला. असा आरोप आहे की, हर्ष यूपीएससीची परीक्षा देण्याचा बहाणा करून सिंगापूरहून एकटा दिल्लीला आला आणि मयूर विहारमध्ये राहू लागला. दिवाळीला स्वाती देखील सिंगापूरहून दिल्लीला आली आणि पतीसोबत सासू - सासऱ्यांसोबत राहू लागली. दरम्यान स्वाती वर्क फ्रॉम होम करत होती. स्वातीने भावाकडे तक्रार केली होती की, सासरची लोकं मारहाण करतात, तिला यातना देतात आणि हुंडा मागतात. १९ जानेवारी रोजी स्वातीच्या आत्महत्येची बातमी मिळाली. त्यामुळे सर्वजण हैराण झाले. अनिरुद्धचं म्हणणं आहे की, स्वाती आत्महत्या करू शकत नाही, कारण गुगल कार्यालयातून तिने दुपारपर्यंत काम केल्याची माहिती मिळत आहे.