महिला पोलिसांसाठी खुशखबर; आठ तासांच्या ड्युटीचा नागपूर पॅटर्न राज्यभरात लागू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 21:39 IST2021-09-24T21:33:11+5:302021-09-24T21:39:11+5:30
Police News : ८ ऑगस्टला पोलीस आयुक्तांनी नागपुरात सुरू केली अंमलबजावणी - महिला पोलिसांत आनंदीआनंद

महिला पोलिसांसाठी खुशखबर; आठ तासांच्या ड्युटीचा नागपूर पॅटर्न राज्यभरात लागू
नागपूर : राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिलांना आता १२ तास नव्हे तर ८ तासच ड्युटी दिली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आज हा निर्णय जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, काैटुंबिक जबाबादारी सांभाळून महिला कर्मचाऱ्यांची होणारी धावपळ लक्षात घेत नागपूरचे आयुक्त अमितेशकुमार यांनी शनिवारी, २८ ऑगस्टलाच नागपुरात हा आदेश जारी केला होता. त्यामुळे आज राज्य सरकारने जाहीर केलेला निर्णय नागपूर पॅटर्न मानला जात आहे.
महिला पोलीस म्हणून कर्तव्य बजावताना तिला गृहिणी, आई म्हणूनही जबाबदारी सांभाळावी लागते. त्यामुळे तिची मोठी धावपळ उडते. त्यात येण्याची वेळ पक्की असली तरी घरी जाण्याची वेळ ठरलेली नसते. ऐनवेळी कुठे काही घडले तर तर तिला घरी जाण्याऐवजी घटनास्थळी पोहचावे लागते. त्यामुळे अनेकदा तिचा चिमुकला किंवा चिमुकली वाट बघत असतात. महिला पोलिसांची ही परवड लक्षात घेत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी २८ ऑगस्टला आदेश जारी करून नागपूर पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याची वेळ ८ तास निश्चित केली होती. पुढे पुणे आणि अमरावतीतही महिला पोलिसांची ड्युटी आठ तास करण्यात आली. तेव्हापासून महिला पोलीस कर्मचारी पहिल्यापेक्षा अधिक चांगली आणि परिणामकारक सेवा देत असल्याचेही उघड झाले होते. ते लक्षात घेऊन राज्य सरकारने नागपूर पोलीस दलाचा पॅटर्न राज्यभरात लागू करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाविकास आघाडी सरकारच्यावतीने राज्य पोलीस दलातील महिलांना १२ ऐवजी आठ तासांचीच ड्युटी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय राज्यात टप्प्याटप्प्याने लागू होणार असल्याचे राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्टिटच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.
गुड न्यूज! लवकरच महिला पोलिसांचे कामाचे तास १२ वरून ८ तास होणार https://t.co/wBixcsaIg4@supriya_sule@DGPMaharashtra@Dwalsepatil@CMOMaharashtra
— Lokmat (@MiLOKMAT) September 24, 2021
महिला पोलिसांना फेस्टिव्हल गिफ्ट
मुलगी, पत्नी, सून आणि आई अशी वेगवेगळी जबाबदारी सांभाळून कर्तव्य पार पाडणाऱ्या महिला पोलिसांसाठी आठ तासांची ड्युटी म्हणजे, फेस्टिव्हल गिफ्ट ठरले आहे.