बोगस वैद्यकीय चाचणी अहवाल देऊन एलआयसीची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 00:11 IST2019-01-16T00:10:52+5:302019-01-16T00:11:39+5:30
या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानातील कलम 465, 468, 471, 473, 474, 420 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण पुढील तपासासासाठी गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे.

बोगस वैद्यकीय चाचणी अहवाल देऊन एलआयसीची फसवणूक
मुंबई - एलआयसीच्या आरोग्य विम्यासाठी पूर्ववैद्यकीय चाचणी अहवाल देणाऱ्या वाकोल्यातील डॉक्टरसह दोघांना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपींकडून डॉक्टर व शुश्रूषागृहांच्या नावांचे बनावट शिक्के पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
डॉक्टर राकेशकुमार दुग्गल व तंत्रज्ञ किशोर सकपाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुग्गल याचे वाकोला पश्चिम येथे "दत्तात्रय नर्सिंग होम' आहे. या शुश्रूषागृहात आरोग्य विम्यासाठी आवश्यक असलेल्या पूर्ववैद्यकीय चाचणीचे बनावट अहवाल देण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-8 मधील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी तपासणी केली असता, एका खोलीत वैद्यकीय अहवाल तयार केले जात असल्याचे आढळले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून डॉक्टर नावांचे बनावट शिक्के, बनावट वैद्यकीय कागदपत्रे व संगणकाची हार्ड डिस्क असा मुद्देमाल ताब्यात घेतला. त्या ठिकाणी एका शुश्रूषागृहात होणाऱ्या तणावावरील चाचणीचा बनावट अहवालही सापडला. त्यानुसार दुग्गल व सकपाळ यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानातील कलम 465, 468, 471, 473, 474, 420 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण पुढील तपासासासाठी गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे.