"मुलाला टाक, आपण लग्न करू..."; 'आई' असणाऱ्या गर्लफ्रेंडने नकार देताच बॉयफ्रेंडने चिमुकल्याला संपवलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 10:59 IST2025-10-25T10:53:48+5:302025-10-25T10:59:11+5:30
प्रेमात आंधळा झालेला व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकतो, याची कल्पना कुणीच करू शकत नाही. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये अशाच एका प्रेमप्रकरणातून एक धक्कादायक रक्तरंजित घटना घडली आहे.

AI Generated Image
प्रेमात आंधळा झालेला व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकतो, याची कल्पना कुणीच करू शकत नाही. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये अशाच एका प्रेमप्रकरणातून एक धक्कादायक रक्तरंजित घटना घडली आहे. प्रेमप्रकरणात एका ७ वर्षांच्या चिमुकल्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. बर्रामध्ये शुक्रवारी एका ७ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला. यामुळे परिसरात खळबळ माजली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला देखील अटक केली आहे. हे प्रकरण प्रेयसीच्या मुलाचे अपहरण आणि हत्येसही संबंधित असून, प्रियकरच मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे.
घाटमपूरमधील रामसारी गावातील राजमिस्त्री त्याच्या कुटुंबासह बर्रा येथील हरदेव नगर येथे भाड्याने राहत होता. शुक्रवारी दुपारी १:३० च्या सुमारास, त्याच घरात भाडेकरू असलेला शिवम सक्सेना याने राजमिस्त्रीच्या मुलाला बोलावले. नंतर, त्याला खेळणी आणून देण्याच्या बहाण्याने तो त्याला बाहेर घेऊन गेला. दोन तासांनंतरही ते दोघे परतले नाहीत तेव्हा कुटुंबाने त्यांचा शोध सुरू केला. त्यांनी फोन केला, पण शिवमने उत्तर दिले नाही. दुपारी ३:३० वाजता पोलिसांना कळवण्यात आले.
पोलिसांनी ताबडतोब सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. यापैकी एका कॅमेऱ्याने शिवम मुलाला घेऊन ऑटोरिक्षातून स्नेही स्क्वेअर मधून निघताना दिसला. या फुटेजच्या आधारे, पोलीस आरा-२ मधील पांडू नदीच्या काठावर पोहोचले, जिथे शोध घेत असताना, झुडपात मुलाचा मृतदेह आढळला. यावेळी सह पोलीस आयुक्त आशुतोष कुमार आणि नौबस्ता येथील एसीपी चित्रांशु गौतम यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तपासात असे दिसून आले की, आरोपीने हत्येची आधीच योजना आखली होती. गुन्हा घडवून आणण्यासाठी त्याने आधीच जंगली भागाचा शोध घेऊन ठेवला होता.
प्रेयसीला तिच्या मुलाला सोडायचे नव्हते...
डीसीपी दक्षिण दीपेंद्र नाथ चौधरी यांच्या मते, आरोपीचे राजमिस्त्रीच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. त्याला प्रेयसीसोबत चंदीगडमध्ये राहायचे होते. त्याने तिला सांगितले होते की, ते चंदीगडला जाऊन एकत्र राहू. मात्र, ती महिला तिच्या मुलाला मागे सोडण्यास तयार नव्हती. यामुळे आरोपीने मुलाला संपवण्याचा कट रचला. हत्येनंतर तो चंदीगडला पळून जाण्याच्या तयारीत होता, परंतु पोलिसांनी त्याला रात्री १:३० च्या सुमारास फतेहपूर गोही चौकात घेरले. आत्मसमर्पण करण्याऐवजी त्याने पोलिसांवर गोळीबार केला, ज्यामध्ये त्याच्या पायाला गोळी लागली. पोलिसांनी त्याला गंभीर अवस्थेत लाला लजपत राय रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध खून, अपहरण आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.