ठरलेले लग्न मोडण्याची धमकी दिल्याने तरुणीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 20:57 IST2019-04-05T20:57:28+5:302019-04-05T20:57:45+5:30
तू मला खूप आवडतेस, तू माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर मी तुझे लग्न होऊन देणार नाही. मी सर्वांकडे तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली.

ठरलेले लग्न मोडण्याची धमकी दिल्याने तरुणीची आत्महत्या
चाकण : लग्नासाठी वेळोवेळी तरुणीला मेसेज करून, तुझी बदनामी करीन व ठरलेले लग्न मोडील, अशी धमकी देऊन तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका तरुणावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी (दि. ३ एप्रिल ) रोजी सकाळी साडे अकराच्या पूर्वी कोळीये येथील फिर्यादीच्या राहत्या घरी घडली. नयना रघुनाथ कदम ( वय २३, रा. कोळीये, ता.खेड, जि.पुणे ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी महेंद्र अशोक ससाणे ( रा. कोळीये, ता.खेड, जि.पुणे ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलीचे वडील रघुनाथ सयाजी कदम ( वय ५७ ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी कि, सुमारे एक वर्षांपासून ते ३ एप्रिल २०१९ रोजी सकाळी साडे अकरापर्यंत नयना हिस आरोपी महेंद्र याने वेळोवेळी समक्ष भेटून व मोबाईलवरून तिला कॉल व मेसेज करून तू मला खूप आवडतेस, तू माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर मी तुझे लग्न होऊन देणार नाही. मी सर्वांकडे तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली. तसेच एकदा ठरलेले लग्न मोडून व आता ठरलेले लग्न मोडण्याची धमकी देऊन नयना हिचे जीवन नकोसे करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विक्रम पासलकर हे अधिक तपास करीत आहेत.