अनेकदा प्रपोज करुनही तरुणाचा नकार; तरुणीकडून भररस्त्यात ब्लेडनं सपासप वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 16:10 IST2020-02-07T16:02:57+5:302020-02-07T16:10:33+5:30

तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू; अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार नाही

girl attacked boy with a blade in bareilly for ignoring her | अनेकदा प्रपोज करुनही तरुणाचा नकार; तरुणीकडून भररस्त्यात ब्लेडनं सपासप वार

अनेकदा प्रपोज करुनही तरुणाचा नकार; तरुणीकडून भररस्त्यात ब्लेडनं सपासप वार

बरेली: एकतर्फी प्रेमातून तरुणीनं तरुणावर ब्लेडनं वार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातल्या बरेलीमध्ये घडली आहे. वारंवार प्रपोज करुनही तरुण नकार देत असल्यानं तरुणीनं ब्लेडनं चेहऱ्यावर वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तरुणीनं अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही. 

बरेलीतल्या हाफिजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक कनिष्ठ महाविद्यालय आहे. पीडित तरुण आणि त्याच्यावर हल्ला करणारी तरुणी याच महाविद्यालयात शिकतात. तरुणीचं विद्यार्थ्यावर प्रेम आहे. मात्र तरुणाला तिच्याबद्दल प्रेम भावना नाहीत. तरुणीनं पीडित तरुणाला अनेकदा प्रपोज केलं. मात्र त्यानं नकार दिला. त्यामुळे तरुणीनं त्याच्या चेहऱ्यावर ब्लेडनं वार केले. 

पीडित तरुण अभ्यासावर जास्त लक्ष देतो. तर तरुणी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती, अशी माहिती समोर आली आहे. तरुणानं वारंवार नकार दिल्यानं तरुणीनं भररस्त्यात त्याच्या चेहऱ्यावर ब्लेडनं वार केले. यामध्ये तरुण रक्तबंबाळ झाला. त्याला पाहून तरुणीदेखील भोवळ येऊन पडली. 'तुला तुझ्या चेहऱ्याचा गर्व आहे ना? मग मी तो चेहराच विद्रूप करते,' असं म्हणत तरुणीनं तरुणावर वार केल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली.

तरुणीच्या हल्ल्यात जखमी झालेला तरुण सध्या बोलण्याच्या स्थितीत नाही. त्याच्या चेहऱ्यावर ब्लेड हल्ल्याच्या जखमा आहेत. तर हा संपूर्ण प्रकार पाहून तरुणीची आई अतिशय हैराण झाली आहे. ही घटना महाविद्यालयाबाहेर घडल्याची माहिती प्राचार्यांनी दिली. सर्व विद्यार्थी परीक्षा देऊन महाविद्यालयातून निघाल्यानंतर हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं. तरुण-तरुणी दोघेही अल्पवयीन असून या प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
 

Web Title: girl attacked boy with a blade in bareilly for ignoring her