भाडे मागितले म्हणून महिलेचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले; घरकाम करणाऱ्या महिलेमुळे आरोपी सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 15:35 IST2025-12-18T15:29:05+5:302025-12-18T15:35:26+5:30
६ महिन्यांचे भाडे मागितले म्हणून घरमालकिणीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला.

भाडे मागितले म्हणून महिलेचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले; घरकाम करणाऱ्या महिलेमुळे आरोपी सापडले
Ghaziabad Crime:उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजनगर एक्सटेंशनमधील ओरा काईमोरा सोसायटीत अवघ्या काही महिन्यांच्या भाड्याच्या वादातून भाडेकरू दांपत्याने आपल्याच घरमालकिणीची निर्घृण हत्या केली. इतकेच नव्हे तर, हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करून ते सुटकेसमध्ये भरून बेडखाली लपवून ठेवले. १७ डिसेंबरच्या रात्री घडलेल्या या थरारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
सिहानी गेट परिसरात राहणाऱ्या दीपशिखा शर्मा यांचे ओरा काईमोरा सोसायटीत ५०६ क्रमांकाचे एक फ्लॅट आहे. हा फ्लॅट त्यांनी अजय गुप्ता आणि त्याची पत्नी आकृती गुप्ता यांना भाड्याने दिला होता. गेल्या ६ महिन्यांपासून या दांपत्याने घराचे भाडे दिले नव्हते. भाडे मागण्यासाठी १७ डिसेंबर रोजी संध्याकाळी दीपशिखा शर्मा स्वतः या फ्लॅटवर गेल्या होत्या, मात्र त्या रात्री उशिरापर्यंत घरी परतल्याच नाहीत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपशिखा शर्मा फ्लॅटवर पोहोचताच भाडेकरू अजय आणि आकृती यांच्याशी त्यांचा वाद झाला. संतापलेल्या आरोपींनी आधी दीपशिखा यांच्यावर प्रेशर कुकरने हल्ला केला. त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपींनी दुपट्ट्याने त्यांचा गळा आवळून खून केला. हत्या केल्यानंतर आरोपींनी एका धारदार शस्त्राने मृतदेहाचे तुकडे केले आणि ते दोन लहान सुटकेसमध्ये भरून बेडच्या बॉक्समध्ये लपवून ठेवले.
सीसीटीव्ही आणि घरकामाला असलेल्या मिनीची सतर्कता
दीपशिखा रात्री ११:२० पर्यंत घरी न परतल्याने त्यांचे पती उमेश शर्मा चिंतेत पडले. त्यांनी घरकाम करणारी महिला मिनी हिच्यासह सोसायटी गाठली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दीपशिखा फ्लॅटमध्ये जाताना दिसल्या, पण बाहेर येताना दिसल्या नाहीत. याच दरम्यान, आरोपी पती-पत्नी सुटकेस घेऊन बाहेर जाण्याच्या तयारीत होते. त्यांनी ऑटोही बोलावली होती.
मात्र, मिनीने त्यांना थांबवले. आरोपींनी आम्ही शॉपिंगला जातोय असे सांगून पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण मिनीने प्रसंगावधान राखत त्यांना पुन्हा फ्लॅटमध्ये जाण्यास भाग पाडले आणि बाहेरून दरवाजा बंद केला. सोसायटीतील रहिवासी आणि नातेवाईकांनी फ्लॅटचा दरवाजा ठोठावला असता आरोपींनी तो उघडला नाही. आरडाओरडा वाढल्यावर आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण जमावाने त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी जेव्हा फ्लॅटची झडती घेतली, तेव्हा बेडच्या बॉक्समध्ये रक्ताने माखलेल्या सुटकेस सापडल्या, ज्यामध्ये दीपशिखा शर्मा यांचा मृतदेह होता.
पोलिसांची कारवाई
पोलिसांनी सांगितले की, "प्राथमिक चौकशीत असे समोर आले की, थकीत भाडे आणि फ्लॅट रिकामी करण्याच्या इशाऱ्यामुळे आरोपी संतापले होते. त्या रागातूनच त्यांनी हे कृत्य केले. आरोपी अजय आणि आकृती गुप्ता यांना ताब्यात घेण्यात आले असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे."