हुंडा न दिल्याने पत्नीवर घडवून आणला गँगरेप, नवऱ्याने केला लज्जास्पद प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 19:26 IST2022-05-03T19:26:19+5:302022-05-03T19:26:38+5:30
Gangrape Case : एका आरोपीने मला पाच दिवसांपूर्वी कमान इथं आणलं आणि पुन्हा बलात्कार केला, मात्र मी तिथून पळ काढून माझ्या घरी आले. या आरोपी पतीसोबत पीडित महिलेचं लग्न २०१९ साली झालं होतं.

हुंडा न दिल्याने पत्नीवर घडवून आणला गँगरेप, नवऱ्याने केला लज्जास्पद प्रकार
राजस्थान - हुंडा दिला नाही म्हणून एका व्यक्तीने आपल्याच नातेवाईकांकडून आपल्या पत्नीवर सामूहिक बलात्कार घडवून आणल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकाराचा व्हिडीओही पतीने शूट केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावरही अपलोड केला आहे. महिलेच्या घरच्यांना दीड लाख रुपये हुंडा देण्यास असमर्थ ठरल्याने हा धक्कादायक प्रकार करण्यात आला आहे.
हा व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करून त्यातून पैसे मिळवणार असल्याचं आरोपी पतीने आपल्या पत्नीला सांगितलं. या प्रकरणी पत्नीने लैंगिक अत्याचाराप्रकरणी पती आणि त्याचे दोन नातेवाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिलेने तक्रारीत नमूद केले की, माझ्या सासरचे लोक हुंड्यासाठी माझा छळ करत होते. जेव्हा त्यांना हुंडा मिळाला नाही, तेव्हा त्यांच्या नातेवाईकांना माझ्यावर सामूहिक बलात्कार करण्यास भाग पाडलं, ही घटना शूट केली आणि हे व्हिडीओ युट्यूबवर टाकले. त्यानंतर एका आरोपीने मला पाच दिवसांपूर्वी कमान इथं आणलं आणि पुन्हा बलात्कार केला, मात्र मी तिथून पळ काढून माझ्या घरी आले. या आरोपी पतीसोबत पीडित महिलेचं लग्न २०१९ साली झालं होतं.