सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:33 IST2025-11-19T15:33:26+5:302025-11-19T15:33:51+5:30
लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल याला भारतात आणले; अनेक राज्यांची कस्टडीची मागणी

सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आणि कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोई याला आज अखेर अमेरिकेतून भारतात आणण्यात आले. सकाळी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानातून उतरताच अनमोल याला एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले. आता त्याला थेट पतियाळा हाऊस कोर्टात नेले जाणार आहे. अनमोलविरोधात विविध राज्यात 20 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असून, या सर्व प्रकरणात त्याच्यावर कारवाई केली जाईल.
अनमोलवर कोणते आरोप?
अनमोल बिश्नोईवर अनेक गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्यांमध्ये सहभागाचे आरोप आहेत. यामध्ये NCP नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरण, सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या फायरिंगमध्ये सहभाग अशा मोठ्या प्रकरणांचा समावेश आहे. अनमोल ऑर्गनाइज्ड क्राइम सिंडिकेट प्रकरणात वाँटेड होता आणि NIA ने त्याच्यावर 10 लाखांचा इनामही जाहीर केला होता.
दिल्लीतील वसुली प्रकरणातही मुख्य भूमिका
दिल्ली क्राइम ब्रांचच्या आरके पुरम युनिटने 2023 मध्ये एका व्यावसायिकाकडून कोट्यवधी रुपयांची वसुली आणि घराबाहेर फायरिंग या प्रकरणात अनमोलविरोधात FIR दाखल केली होती. या प्रकरणातही दिल्ली पोलिस त्याला कस्टडीमध्ये घेण्याच्या तयारीत आहेत.
मुंबई, पंजाब आणि राजस्थान पोलिसदेखील रांगेत
मुंबई पोलिस: बाबा सिद्दीकी हत्याकांडात अनमोलविरुद्ध चार्जशीट दाखल आहे. सुपारी देणे, योजना आखणे, आणि शस्त्र पुरवणे असे आरोप त्याच्यावर आहेत.
पंजाब पोलिस: सिद्धू मूसेवाला हत्याकांडात अनमोल मुख्य आरोपी.
राजस्थान पोलिस: आधीपासून FIR दाखल; 1 लाख रुपयांचा इनाम जाहीर.
देशभरातील एकूण 20+ प्रकरणे त्याच्याविरोधात नोंदवलेली आहेत.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नेटवर्क
बिश्नोई गँगचे नेटवर्क दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, चंदीगढ, बंगाल, बिहार, यूपी, उत्तराखंड, हिमाचल, एमपी आणि गुजरात अशा राज्यांमध्ये सक्रिय आहे. परदेशातही कनडा, अमेरिका, पोर्तुगाल, दुबई, अझरबैजान, फिलिपाईन्स आणि लंडन गँघचा प्रभाव आहे. माहितीनुसार, गँघमध्ये सुमारे 1000 सक्रिय सदस्य आहेत. प्रत्येक सदस्याला फक्त पुढच्या व्यक्तीचीच माहिती आहे. एका टारगेटसाठी 7-8 लेयरमध्ये कामाचे विभाजन केले जाते. या मॉडेलमुळे पोलिसांना संपूर्ण गँगची रचना समजणे अत्यंत अवघड जाते.
गँगवॉरमुळे अनमोलच्या सुरक्षेची मोठी चिंता
लॉरेंस बिश्नोई गँगची गोल्डी ब्रार, रोहित गोडारा यांच्याशी दीर्घकालीन वैर आहे. अलीकडेच दुबईत रोहित गोडाराने लॉरेंस-समर्थक फाइनान्सरची हत्या केल्यानंतर गँगवॉर अधिक तीव्र झाले आहे. यामुळेच अनमोल बिश्नोईची भारतातील सुरक्षा हे सुरक्षा यंत्रणांसाठी मोठे आव्हान मानले जात आहे. विविध राज्यांच्या कारवाया पूर्ण झाल्यानंतर अनमोलला कुठे ठेवले जाईल, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. विरोधी गँगकडून संभाव्य हल्ल्यांची शक्यता लक्षात घेता सुरक्षा यंत्रणा त्याच्या लोकेशनबाबत अत्यंत गोपनीयता राखण्याची शक्यता आहे.