स्विगी-ब्लिंकिटच्या ड्रेसमध्ये आले अन् ६ मिनिटांत लुटून पळाले; दिवसाढवळ्या दागिन्याच्या दुकानावर दरोडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 16:07 IST2025-07-25T16:04:42+5:302025-07-25T16:07:58+5:30
उत्तर प्रदेशात स्विगी आणि ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयच्या वेशात आलेल्या दोघांनी सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकला.

स्विगी-ब्लिंकिटच्या ड्रेसमध्ये आले अन् ६ मिनिटांत लुटून पळाले; दिवसाढवळ्या दागिन्याच्या दुकानावर दरोडा
Ghaziabad Showroom Gold Robbery:उत्तर प्रदेशच्या गाझीयाबादमध्ये दिवसाढवळ्या एका सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानात दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली. गाझियाबादमध्ये, स्विगी आणि ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयच्या वेशात आलेल्या दोघांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी दुकानातील दागिने आणि इतर वस्तू स्विगीच्या बॅगेत भरल्या. आणखी एक काळ्या रंगाच्या बॅगेतह आरोपींनी दुकानातील वस्तू भरल्या आणि पळ काढला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून सामानाची डिलिव्हरी करणाऱ्यांच्या वेशात दरोडेखोरांनी चोरी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
गाझियाबादमध्ये गुरुवारी दुपारी ३:३० वाजता लिंक रोडवरील एका दागिन्यांच्या दुकानात दरोडेखोरांनी लुटमार केली. स्विगी आणि ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयच्या वेशात दोन दरोडेखोर दुचाकीवरून आले होते. दोघेही दुकानात घुसले आणि कर्मचाऱ्याला धमकावू लागले, तेवढ्यात मालकाचा मुलगा तिथे आला. दरोडेखोरांनी त्याच्या डोक्यावर पिस्तूल लावले. त्यानंतर आरोपींनी दुकानातील २० किलो चांदी, १२५ ग्रॅम सोने आणि २०,००० रुपये रोख दोन बॅगांमध्ये भरले. एवढ्यावरच न थांबता त्यांना दुकान मालकाच्या मुलाला आणि कर्मचाऱ्याला बंदुकीच्या धाकावर दुकानाबाहेर काढले आणि नंतर दुचाकीवरून पळ काढला.
चोरलेले सोने आणि चांदीची किंमत सुमारे ३५ लाख असल्याचे सांगण्यात आलं. सराफा व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुकानात बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. हेल्मेट घातलेले आणि रुमालाने तोंड झाकलेले दरोडेखोर दिसत होते. कृष्ण कुमार वर्मा यांचे मानसी ज्वेलर्स नावाचे हे दुकान आहे. त्यांनी २ वर्षांपूर्वी हे दुकान विकत घेतले आणि व्यवसाय सुरू केला. गुरुवारी दुपारी ३:३० वाजता २ दरोडेखोर दुचाकीवरून आले. दोघेही स्विगी आणि ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयच्या वेशात होते जेणेकरून कोणालाही त्यांच्यावर संशय येऊ नये. दरोडेखोर दुकानात घुसले त्यावेळी दुकान मालकाचा मुलगा शुभम वर्मा त्याच्या कर्मचाऱ्यासह दुकानात होता.
आधी दरोडेरांनी कर्मचाऱ्याला धमकावण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कर्मचारी आणि शुभमवर पिस्तूल रोखली. दोघांनाही धमकावून मारहाण करण्यात आली. दोघांनीही दुकानात ठेवलेले सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम दोन बॅगांमध्ये भरली. यानंतर आरोपींनी दोघांनाही दुकानाबाहेर काढले आणि दुचाकीवरून पळून पळ काढला. पोलिसांना संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ सहा मिनिटांत हा सगळा प्रकार घडला. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून बाईकचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक तपासात बाईकवरील नंबर प्लेट बनावट असल्याचे समोर आले आहे. दरोडेखोर दिल्लीहून आले होते.