एटीएम सेंटरमध्ये ग्राहकांना मदत करण्याच्या बहाण्याने गंडा; चौकडीस अटक

By जितेंद्र कालेकर | Published: January 12, 2023 11:16 PM2023-01-12T23:16:21+5:302023-01-12T23:17:21+5:30

...त्यांच्याकडून आठ गुन्हे उघडकीस आले असून, १०१ एटीएम कार्ड जप्त केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गुरुवारी दिली.

Fraud under the guise of assisting customers at an ATM center; Twenty-four arrested | एटीएम सेंटरमध्ये ग्राहकांना मदत करण्याच्या बहाण्याने गंडा; चौकडीस अटक

एटीएम सेंटरमध्ये ग्राहकांना मदत करण्याच्या बहाण्याने गंडा; चौकडीस अटक

Next

ठाणे : एटीएम सेंटरमध्ये ग्राहकांना मदत करण्याच्या बहाण्याने वृद्धांसह अनेकांना गंडा घालणाऱ्या सनी मुन्नासिंग उर्फ सनी चिकणा (२८, रा. कोळशेवाडी, कल्याण) याच्यासह चार जणांच्या टोळक्याला ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून आठ गुन्हे उघडकीस आले असून, १०१ एटीएम कार्ड जप्त केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गुरुवारी दिली.

भिवंडी येथे राहणाऱ्या तसेच ठाण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या रुपाली बोचरे (३२) यांना त्यांच्या एका नातेवाइकास पैसे पाठवायचे असल्याने त्या वागळे इस्टेट भागातील रोड क्रमांक २२ येथील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे डिपॉझिट करण्यासाठी २ जानेवारी २०२३ रोजी गेल्या होत्या. एटीएमद्वारे ५० हजारांची रोकड डिपॉझिट करीत असताना तिथे एका अज्ञाताने त्यांना मदत करण्याचा बहाणा केला. त्याने पैसे कसे डिपॉझिट करावे, असे सांगत असतानाच एटीएम कार्ड बदलून दुसरेच कार्ड रुपाली यांना दिले. यावेळी त्याने रुपाली यांच्या एटीएमचा पिन क्रमांकही चलाखीने माहिती करून घेतला. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून ३८ हजार ५०० रुपये त्याने काढून घेतले. याप्रकरणी रुपाली यांनी श्रीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा तपास ठाणे खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला.

घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही फुटेज, संशयिताचे वर्णन आणि गुप्त खबरीद्वारा मिळालेल्या माहितीच्या आधारे यातील एक भामटा पंढरपूर येथे पळून गेल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांना मिळाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक महेश कवळे, हवालदार तानाजी पाटील आणि अरविंद शेजवळ आदींच्या पथकाने एसबीआय बँकेच्या सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी केली. त्यानंतर सनी उर्फ सनी चिकणा, श्रीकांत गोडबोले  उर्फ श्री (२८, उल्हासनगर), हरिदास मोहन मगरे उर्फ हऱ्या  (२५, उल्हासनगर) या तिघांना ९ जानेवारी रोजी पंढरपूर येथून, तर रामराव उर्फ कचरू शेंडफड शिरसाठ (३५, रा. उल्हासनगर) याला उल्हासनगर येथून अटक झाली. त्यांच्याविरूद्ध पूर्वी असे नऊ गुन्हे दाखल असून, आणखी आठ गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली. त्यांच्याकडून फसवणूकीतील रकमेपैैकी ७० हजारांची रोकड, गुन्हयासाठी वापरलेले वाहन आणि इतर सामुग्री असा चार लाख सहा हजार दोनशे रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

त्यांना १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. या टोळीने ठाणे व नवी मुंबई परिसरात अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले.
 

 

Web Title: Fraud under the guise of assisting customers at an ATM center; Twenty-four arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.