राधिकाच्या पाठीत नाही तर छातीत मारल्या चार गोळ्या; वडिलांना दिलेली कबुली पोस्टमॉर्टम रिपोर्टपेक्षा वेगळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 18:54 IST2025-07-11T18:30:37+5:302025-07-11T18:54:49+5:30
हरियाणाच्या टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राधिकाच्या पाठीत नाही तर छातीत मारल्या चार गोळ्या; वडिलांना दिलेली कबुली पोस्टमॉर्टम रिपोर्टपेक्षा वेगळी
Tennis player Radhika Yadav Death: गुरुग्राममधील पॉश भागात असलेल्या सुशांत लोकमधील टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येने खळबळ उडाली. राधिका जेवण बनवत असताना तिचे वडील दीपक यादव यांनीच तिच्यावर गोळ्या झाडल्या. टेनिस अकादमी सुरु करण्यावरुन आणि रील्स बनवण्यावरुन दीपक यादव नाराज होता. गावकऱ्यांच्या टोमण्यांनी वैतागल्यामुळे मी राधिकाची हत्या केली असं दीपक यादवने सांगितले. मात्र आता राधिकाच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
टेनिसपटू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी राधिकाच्या वडिलांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. राधिकाचा शवविच्छेदन अहवालही समोर आला आहे. राधिकाच्या हत्येबद्दल केल्या जाणाऱ्या दाव्यांपेक्षा शवविच्छेदन अहवालातून वेगळीच माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, राधिकाच्या शरीरातून चार गोळ्या काढण्यात आल्या आणि चारही गोळ्या तिच्या छातीत लागल्या होत्या. मात्र याआधी राधिकाच्या वडिलांनी मागून गोळ्या झाडल्या होत्या आणि त्यापैकी तीन गोळ्या तिच्या पाठीवर लागल्या असा दावा केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, राधिकाच्या वडिलांनी स्वतः आपला गुन्हा कबूल केला आणि सांगितले की मी राधिकावर तीन गोळ्या झाडल्या. पण आता शवविच्छेदन अहवालानंतर दीपक यादवने दिलेल्या कबुलीजबाबावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मी राधिकाच्या कमाईवर अवलंबून असल्याने मला अनेकदा टोमणे मारले जात होते, असं दीपक यादवने सांगितले. पोलिसांनी सांगितले की, दीपक राधिकावर टेनिस अकादमी चालवल्याबद्दलही रागावला होता. दीपकने अनेक वेळा राधिकाला अकादमी बंद करण्यास सांगितले होते, पण तिने ऐकले नाही. रागाच्या भरात दीपकने राधिकावर तीन गोळ्या झाडल्या.
राधिकाची हत्या तिच्या घराच्या पहिल्या मजल्यावर झाली. त्यावेळी तिची आई, वडील आणि राधिका घरीच होते. काका कुलदीप त्यांच्या कुटुंबासह तळमजल्यावर राहत होते. घटनेच्या वेळी राधिकाचा भाऊ ऑफिसमध्ये होता. मोठा आवाज ऐकू आला आणि मी वरच्या मजल्यावर धावत गेलो. राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. माझा मुलगाही वरच्या मजल्यावर आला, असं राधिकाच्या काकांनी सांगितले. दोघांनीही राधिकाला त्यांच्या गाडीतून रुग्णालयात नेले जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.