टीव्ही अभिनेत्रीसह चौघांना अटक; वर्सोवा, पायधुनीतून अंमली पदार्थ जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2020 22:50 IST2020-10-25T22:50:15+5:302020-10-25T22:50:42+5:30
Tv Actress Arested : एनसीबीची कारवाई प्रीतिका चौहान काही वर्षांपूर्वी संकटमोचन महाबली हनुमान या टीव्ही मालिकेत तसेच झमेला या सिनेमात अभिनय केला आहे.

टीव्ही अभिनेत्रीसह चौघांना अटक; वर्सोवा, पायधुनीतून अंमली पदार्थ जप्त
मुंबई - अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) शनिवारी दक्षिण मुंबई व पश्चिम उपनगरात छापा टाकून एका टीव्ही महिला सह कलाकारासह चौघांना अटक केली. प्रीतिका चौहान ,रोहित हिरे,ब्रुनो जॉन नगवाले व दीपक राठोड अशी त्यांची नावे आहेत. ब्रुनो हा टांझानियाचा रहिवासी आहे.
अंधेरीतील वर्सोवा येथे छापा टाकून प्रीतिका चौहान ,व रोहित यांना अटक केली. त्याच्याकडून गांजा जप्त करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोघांना ८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
प्रीतिका चौहान काही वर्षांपूर्वी संकटमोचन महाबली हनुमान या टीव्ही मालिकेत तसेच झमेला या सिनेमात अभिनय केला आहे. तिच्याकडून टीव्ही सिरीयल मधील ड्रग्ज तस्करीत गुंतलेले अन्य कलाकाराची नावे पुढे येण्याची शक्यता आहे.
एनसीबीने शुक्रवारी दक्षिण मुंबईत महंमद अली रोडवर एका मशिदीजवळ ब्रुनो जॉनला पकडून त्याच्याकडील ४ ग्रॅम कोकेन जप्त केले तो टांझानियाचा नागरिक असून त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री वर्सोवा येथे छापा टाकून ४.४० एक्सटे, १.८८ ग्रॅम एमडी पावडर ३२५ ग्रॅम गांजा,३२ ग्रॅम चरस,५ ग्रॅम मेथेमडाईन एका वाहनातून जप्त केले. यावेळी दीपक राठोड याला पकडन्यात आले असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.
बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी आतापर्यंत एनसीबीने २४ हुन अधिकजनांना अटक केली. त्यामध्ये सुशांतसिह राजपूत याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह तिच्या भावाचा समावेश आहे.
सध्या रियासह काही आरोपी सशर्त जामिनावर आहेत.