मध्यप्रदेशातून एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या चौघांना ठाण्यात अटक, दोन कोटी २४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:49 IST2025-11-13T17:49:17+5:302025-11-13T17:49:47+5:30
त्यांच्याकडून एक किलो ७१ ग्रॅम सहा मिलीग्रॅम वजनाच्या एमडीसह दोन कोटी २४ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मध्यप्रदेशातून एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या चौघांना ठाण्यात अटक, दोन कोटी २४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
ठाणे: मध्यप्रदेशातून मेफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या इम्रान उर्फ बब्बू खान (३७) याच्यासह चौघांना अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हेअन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी गुरुवारी दिली. त्यांच्याकडून एक किलो ७१ ग्रॅम सहा मिलीग्रॅम वजनाच्या एमडीसह दोन कोटी २४ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अंमली पदार्थ विक्री बाबत विशेष मोहीम राबवून कडक कारवाईचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उपायुक्त जाधव, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र दौंडकर आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल मस्के यांनी विशेष मोहीम राबविली. त्याच अंतर्गत पोलीस हवालदार अमित सकपाळ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ३ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या चरईतील एमटीएनएल कार्यालयासमोर एमडी तस्करीसाठी आलेल्या इम्रान याच्यासह वकास खान (३०), ताकुद्दीन खान (३०) आणि कमलेश चौहान (२३, सर्व रा. मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून विक्रीसाठी आणलेले दोन कोटी १४ लाख ३२ हजारांचे एक किलो ७१ ग्रॅम सहा मिलीग्रॅम वजनाचे एमडी हस्तगत केले आहेत. तस्करीसाठी वापरलेल्या एका कारसह दोन कोटी २४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
या एमडीचे उत्पादन, विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाºयांमध्ये आणखी कोणा कोणाचा समावेश आहे? याचा तपास करण्यात येत असल्याचे उपायुक्त जाधव यांनी सांगितले. सर्व आरोपींना १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. चौघांपैकी इम्रान आणि कमलेश हे दोघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.