अरे देवा! मंदिरात पूजा करताना मंत्र्यांचा आयफोन गायब; CCTV मध्येही सापडला नाही चोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 13:12 IST2025-04-07T13:11:05+5:302025-04-07T13:12:10+5:30
पटना येथील शीतला माता मंदिरात पूजा करत असताना त्यांचा आयफोन चोरीला गेला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत .

फोटो - nbt
बिहारच्या माजी उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली. पटना येथील शीतला माता मंदिरात पूजा करत असताना त्यांचा आयफोन चोरीला गेला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि सीसीटीव्ही फुटेज पाहत आहेत. सीसीटीव्हीमध्येही चोर पकडला गेला नाही. रेणू देवी अगमकुआं येथील शीतला माता मंदिरात पूजा करण्यासाठी गेल्या होत्या, तेव्हा त्यांचा फोन अचानक गायब झाला.
रेणू देवी शीतला माता मंदिरात पूजा करण्यासाठी गेल्या होत्या. त्या बिहारच्या माजी उपमुख्यमंत्री होत्या. सध्या त्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन मंत्री आहेत. त्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्या मानल्या जातात. त्यांचा मोबाईल मंदिरात गायब झाला. डीएसपी-२ गौरव कुमार यांनी सांगितलं की, एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि शोध सुरू आहे.
पर्स आणि मोबाईल दोन्ही गायब
मिळालेल्या माहितीनुसार, रेणू देवी शितला माता मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यांच्या हातात पूजेचं ताट होतं. त्यांनी त्यांचा मोबाईल एका छोट्या पर्समध्ये ठेवला आणि ती पर्स ताटात ठेवली. पूजा झाल्यानंतर त्या बाहेर आल्या तेव्हा त्यांची पर्स आणि मोबाईल दोन्ही गायब होते.
CCTV मध्येही सापडला नाही चोर
मंदिर परिसरात त्यांचा फोन शोधण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. बायपास पोलीस स्टेशनला याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. मंदिरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेजही पाहिलं, पण त्यामध्ये काहीही सापडलं नाही.
पूजेच्या ताटात ठेवलेली पर्स कुठेतरी पडली असावी असा पोलिसांना संशय आहे. डीएसपी-२ गौरव कुमार म्हणाले की, बायपास पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मोबाईलमधील सिम नंबरच्या आधारे पोलीस तपास करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत आणि लवकरच चोर पकडला जाईल अशी अपेक्षा आहे.