मौजमजेसाठी मोटारसायकल चोरणारे पाच जण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 19:59 IST2018-09-18T19:58:08+5:302018-09-18T19:59:02+5:30
मौजमजासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागांतून दुचाकी चोरणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

मौजमजेसाठी मोटारसायकल चोरणारे पाच जण अटकेत
औरंगाबाद : मौजमजासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागांतून दुचाकी चोरणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनीअटक केली. आरोपींकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, यातील एक मोटारसायकल एका फौजदाराची असल्याचे तपासात समोर आले. आरोपींकडून वाहन चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता गुन्हे शाखेने वर्तविली.
गणेश बळीराम गवळी (रा.कैलासनगर), प्रितेश रामराव वाघमारे (हरिओमनगर, चिकलठाणा), मंगेश अरुण वेळंजकर ( रा.संजयनगर), राहुल सुदाम घोडके (रा. भवानीनगर) आणि सुमेध शरदराव वावळे (रा. शहानूरमियाँ दर्ग्याजवळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव हे १६ सप्टेंबर रोजी कर्मचाऱ्यांसह गस्तीवर असताना बारापुल्ला दरवाजाजवळ काही जण उभे असून ते चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती खबऱ्याने त्यांना दिली.
पथकाने संशयावरून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली देऊन शहरातील वेगवेगळ्या भागांतून ही वाहने चोरल्याचे सांगितले. चौकशीअंती पैठण रस्ता परिसरातील रहिवासी सचिन मिरधे यांची मोटारसायकल चोरली होती. याप्रकरणी सातारा ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. अन्य दोन दुचाकी जवाहरनगर ठाणे आणि सिडको हद्दीतून पळविल्याची कबुली आरोपींनी दिली. या तिन्ही मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या.
मौजमजेसाठी ते दुचाकी चोरत होते. चोरलेल्या दुचाकी पाच ते दहा हजारांत विक्री करीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या मोटारसायकलींना ग्राहक मिळत नव्हते. ग्राहकांच्या शोधात असताना चोरटे पोलिसांच्या हाती लागले. ही कारवाई निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय जाधव, हवालदार संजय धुमाळ, सुरेश काळवणे, रमेश भालेराव, समद पठाण, भावलाल चव्हाण, संदीप बीडकर, अनिल थोरात यांनी केली.