ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
By जितेंद्र कालेकर | Updated: July 15, 2025 00:26 IST2025-07-15T00:25:35+5:302025-07-15T00:26:14+5:30
ठाणे महापालिकेच्या शाळेजवळ सोमवारी सकाळी घडला प्रकार

ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: शहरातील सावरकरनगर, यशोधननगर आणि लोकमान्यनगर या भागातील नववी आणि दहावीतील १६ ते १७ वयोगटातील पाच विद्यार्थिनींचा एका विकृत तरुणाने विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार साेमवारी सकाळी घडला. या घटनेनंतर आरोपीने पलायन केले असून त्याच्या अटकेची मागणी परिसरातील पालकांनी वर्तकनगर पोलिसांकडे केली. आरोपीच्या शोधासाठी एका पथकाची निर्मिती केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आरडी वाघचवरे यांनी दिली.
सावरकरनगर भागातील ठाणे महापालिकेच्या शाळेजवळ सोमवारी (१४ जुलै) सकाळी ७.३० ते ८.३० वाजण्याच्या दरम्यान विनयभंगाचा प्रकार घडल्याची तक्रार एका १६ वर्षीय पीडितेने वर्तकनगर पोलिसांना दिली. या तरुणीशी त्या तरुणाने साधारण १५ ते २० मिनिटे लगट करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शाळेच्या आवारापासून अवघ्या १५० मीटर अंतरावर घडल्याचेही पीडितेने सांगितले. तिने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर पालकांनी दुपारी वर्तकनगर पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.
त्यानंतर काही अंतराने अन्य चार विद्यार्थिनींसोबत त्याच तरुणाने असेच गैरकृत्य केल्याचे उघड झाले. पाचही घटनांमधील आरोपीचे वर्णन एकच असून विनयभंग- बीएनएस कलम ७४ आणि पोक्सो कलम ८-१२ अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली. आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.