दुर्दैवी! कामाचा पहिलाच दिवस ठरला शेवटचा; वीज कोसळून तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 06:25 PM2021-10-08T18:25:58+5:302021-10-08T19:56:37+5:30

Death Of Girl : आज सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर खडकी येथे मीराताई लोहकरे हिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

The first day of work became the last; The young girl was killed by a lightning strike | दुर्दैवी! कामाचा पहिलाच दिवस ठरला शेवटचा; वीज कोसळून तरुणीचा मृत्यू

दुर्दैवी! कामाचा पहिलाच दिवस ठरला शेवटचा; वीज कोसळून तरुणीचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देमीराताई सखाराम लोहकरे (वय 19 रा. भोरदरा पठारवस्ती खडकी)असे वीज पडून मरण पावलेल्या तरुणीचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.तिचे वडील घोडेगाव येथे पोस्टमन म्हणून काम करतात. गुरुवारी सायंकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सखाराम लिंबाजी लोहकरे यांनी या घटनेची माहिती मंचर पोलिसांना दिली. पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.

मंचर - वडिलांसोबत घरी परतणाऱ्या तरुणीवर वीज कोसळून ती जागीच ठार झाली आहे. ही दुर्दैवी घटना आंबेगाव तालुक्यातील खडकी येथे गुरुवारी सायंकाळी घडली. मीराताई सखाराम लोहकरे (वय 19 रा. भोरदरा पठारवस्ती खडकी)असे वीज पडून मरण पावलेल्या तरुणीचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मागील चार दिवसांपासून दररोज सायंकाळी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. खडकी येथील मीराताई लोहकरे ही तरुणी मंचर येथे महाविद्यालयात शिक्षण घेत होती. शिक्षण घेत असताना एका कापड दुकानात ती काम करत होती. तिचा आज कामाचा पहिलाच दिवस होता. तिचे वडील घोडेगाव येथे पोस्टमन म्हणून काम करतात. गुरुवारी सायंकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी तरुणी मीराबाई ही वडील सखाराम लोहकरे यांच्यासमवेत त्यांच्या दुचाकीवरून मंचर येथून घरी येण्यासाठी निघाली. भोरदरा पठारवस्ती त्यांचे घरापासून जवळ काही अंतरावर असताना मुसळधार पाऊस सुरू होता. विजांचा कडकडाट सुरू होता. घराच्या अलीकडे 200 मीटर अंतरावर खड्ड्यात पाणी साचले होते. त्यामुळे वडील सखाराम लोहकरे यांनी मुलगी मीराताई हिला दुचाकीवरून खाली उतरवले आणि  ते दुचाकीवरून पंधरा फूट अंतरावर पुढे गेले असता मीराताईच्या अंगावर विज पडली. त्यामध्ये तिच्या खांद्यावर व हातावर विजेमुळे जखमा होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. समोर चाललेले वडील सखाराम लोहकरे यांना विजेच्या आवाजाने डोक्याला दणका बसला आहे. विजेची तीव्रता एवढी होती की, आजूबाजूच्या घरांना तडे गेले आहेत.काही घरातील विजेचे बोर्ड फुटले तसेच विद्युत उपकरणे जळाली आहेत. घराच्या ओट्यावर विजेचा लोळ पडला. यावेळी वीज पुरवठा खंडित झाला होता. तो रात्री सुरळीत करण्यात आला. रुग्णवाहिकेतून मीराताई लोहकरे हीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.

आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी व प्रशासन यावेळी उपस्थित होते. आज सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर खडकी येथे मीराताई लोहकरे हिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, भीमाशंकर कारखान्याचे संचालक दादाभाऊशेठ पोखरकर, सरपंच कु्ष्णाशेठ भोर, उपसरपंच मयुरी वाबळे, माजी सरपंच अशोक भोर, दिपक बांगर, बाळासाहेब पोखरकर, राजु बांगर, अर्जुन बांगर, दत्तात्रय बांगर, नारायण बांगर, काळभैरवनाथ विद्यालयचे शिक्षक, मिराताई यांचा महाविद्यालयीन मित्र परिवार उपस्थित होते.दरम्यान मयत मीराताई लोहकरे तिच्या पाठीमागे आई, वडील, एक भाऊ, दोन विवाहित बहिणी, चुलते असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सखाराम लिंबाजी लोहकरे यांनी या घटनेची माहिती मंचर पोलिसांना दिली. पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.
 

वीज पडून मृत्यूमुखी पडलेली तरुणी मीराताई लोहकरे ही वडील सखाराम यांच्यासमवेत घरी परतत होती. विशेष म्हणजे वीज कोसळली त्यावेळेस वडील सखाराम हे दुचाकीसह थोडे अंतर पुढे गेल्याने या घटनेत बालंबाल बचावले. मात्र मीराताईचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिचा काळ आला होता. मात्र वडील सखाराम याची वेळ आली नव्हती. ही चर्चा आज दिवसभर परिसरात सुरू होती.

Web Title: The first day of work became the last; The young girl was killed by a lightning strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.