शेकोटीची ऊब जीवावर बेतली, आगीत होरपळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 16:41 IST2022-01-12T16:37:43+5:302022-01-12T16:41:58+5:30
Accidental Death : पंचवटी परिसरातील गोदाकाठालगत असलेल्या वाघाडीतील वसाहतीत बुरूडडोह भागात एका ३०वर्षीय फिरस्त्या महिलेला शेकोटीमध्ये जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे.

शेकोटीची ऊब जीवावर बेतली, आगीत होरपळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू
नाशिक : चार दिवसापासून शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे बचावासाठी झोपडपट्टी भागासह गोदाकाठालगत तसेच पंचवटी, जुने नाशिकसारख्या गावठाण भागात नागरिकांकडून शेकोट्या पेटवून ऊब मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाघाडीत अशाचप्रकारे शेकोटीभोवती बसलेले असताना अचानक आगीचा भडका उडाल्याने एका फिरस्त्या महिलेचा त्यामध्ये होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला तसेच दोघे जखमी झाल्याची घटना घडली.
पंचवटी परिसरातील गोदाकाठालगत असलेल्या वाघाडीतील वसाहतीत बुरूडडोह भागात एका ३०वर्षीय फिरस्त्या महिलेला शेकोटीमध्ये जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. गेल्या आठवड्यात (दि.४) वाघाडी परिसरात महिला व तिच्या समवेत इतर दोघेजण सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेकोटी पेटवून त्याभोवती बसलेले होते. त्याच वेळी शेकोटीचा मोठा भडका उडाला आणि ज्वाला महिलेच्या साडीला लागल्याने ती गंभीररित्या भाजली. तसेच अन्य दोघा पुरुषांनाही या भडक्याची झळ बसली. या सर्व जखमींना नागरिकांनी तत्काळ शासकिय जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते सदर घटनेत जखमी झालेल्या एका अनोळखी इसमाने उपचार घेतल्यानंतर त्याने रुग्णालयातून पळ काढला तर गंभीर जखमी असलेल्या महिलेचे उपचारादरम्यान मंगळवारी (दि.११) निधन झाले. दरम्यान, महिला फिरस्ती असल्याने तीची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. तसेच पोलिसांकडून तिच्या नातेवाईकांचा व वारसदारांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.