अखेर उल्हासनगर महापालिकेचा जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 20:33 IST2022-03-14T20:32:51+5:302022-03-14T20:33:40+5:30
Suspension : २२ दिवस उलटूनही पोलिसांना भदाणे सापडेना

अखेर उल्हासनगर महापालिकेचा जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे निलंबित
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेत नोकरी साठी जन्मदाखल्यात फेरफार, पीएचडी पदवी अवैध प्रकरणी मध्यवर्ती तर नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी तुर्भे येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेला महापालिका जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे गेल्या २२ दिवसापासून फरार आहे. महापालिका आयुक्तांनी अखेर निलंबनाच्या प्रस्तावावर सही केली. अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली असून फरार झालेल्या भदाणेला अटक करण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
उल्हासनगर महापालिकेचा वादग्रस्त जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी नोकरी मिळविण्यासाठी जन्मतारखेत फेरफार केल्या बाबत व पीएचडी पदवी अवैध असल्याचा ठपका महापालिकेने ठेवला. याप्रकरणी २१ फेब्रुवारी रोजी महापालिका सहायक आयुक्त अच्युत सासे यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान नवीमुंबई येथील एपीएमसी पोलीस ठाण्यात उल्हासनगरातील एका महिलेला नोकरीचे आमिष दाखवून बलात्काराचा गुन्हाही भदाणे यांच्यावर दाखल झाला. दोन्ही गुन्ह्यात फरार असलेला भदाणे याने वकील मार्फत दोन्ही गुन्ह्यात अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी ठाणे व कल्याण न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र दोन्ही गुन्ह्यात न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने भदाणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार लटकलेली आहे.
भदाणे यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले असून न्यायालयाने त्याचे अटकपूर्व जामीन फेटाळल्याने, महापालिका आयुक्त डॉ दयानिधी हे निलंबनाची कारवाई का करीत नाही?. अशी टीकेची झोळ आयुक्तावर उठली होती. अखेर... महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी सोमवारी भदाणे यांच्या निलंबनाच्या प्रस्तावात सही केल्याची माहिती महापालिका विश्वसनीय सूत्रांनी दिली. तसेच एका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे. आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता झाला नाही. भदाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार दिलीप मालवणकर, रामेश्वर गवई यांनी समाधान व्यक्त केले. मात्र शहरातील मध्यवर्ती व एपीएमसी पोलीस तुर्भे नवीमुंबईची पोलीस गेल्या २२ दिवसा पासून भदाणे याला शोधण्यात अपयशी ठरल्या बाबत नाराजी व्यक्त केली.
मध्यवर्ती पोलिसांकडून तपास काढा...मालवणकर
महापालिकेचा जनसंपर्क अधिकारी भदाणे यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल होण्याला २२ दिवस उलटले आहे. मात्र पोलिसांना भदाणे मिळून आला नाही. तपासा बाबत मालवणकर यांनी संशय व्यक्त करून तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्याची मागणी केली.