इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 11:48 IST2025-09-16T11:48:12+5:302025-09-16T11:48:55+5:30
सहा मुलांच्या ३८ वर्षीय वडिलांचे १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. दोघांनीही एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली

फोटो - आजतक
बागपतमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा मुलांच्या ३८ वर्षीय वडिलांचे १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. दोघांनीही एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली आणि विषप्राशन केलं. दोघेही रेल्वे ट्रॅकवर बेशुद्ध अवस्थेत आढळले. दोघांचाही रुग्णालयात मृत्यू झाला आहे. कोतवाली बरौत परिसरातील बिजरौल रेल्वे हॉल्ट परिसरात ही खळबळजनक घटना घडली.
रविवारी सकाळी स्थानिक लोकांनी रेल्वे ट्रॅकच्या कडेला दोघांना बेशुद्ध अवस्थेत पडलेलं पाहिलं. दोघांच्या तोंडातून फेस येत होता आणि त्यांची प्रकृती खूपच गंभीर होती. स्टेशन मास्टरने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं. परिस्थितीचं गांभीर्य पाहून डॉक्टरांनी त्यांना मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केलं. पण दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मुलगी १७ वर्षांची असून ती शामली जिल्ह्यातील रहिवासी होती. प्रियकर देशपाल (३८) हा देखील शामली जिल्ह्यातील रहिवासी होता. देशपाल सहा मुलांचा बाप होता, तो त्याच्या कुटुंबासोबत राहत होता. दोघेही वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करत होते. कामादरम्यान ते एकमेकांना भेटले आणि हळूहळू प्रेमात पडले. लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघंही एकमेकांच्या घरी येत असत आणि त्यामुळेच कुटुंबातील सदस्यांना या नात्याची आधीच माहिती होती.
मुलगी आणि देशपाल गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होते. मुलीच्या कुटुंबाने बाबरी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. कुटुंबीय अस्वस्थ होते आणि शोध घेत होते. याच दरम्यान अचानक दोघेही रेल्वे ट्रॅकवर बेशुद्ध अवस्थेत आढळल्याची बातमी आली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बागपत ते शामलीपर्यंत्या लोकांमध्ये याचीच चर्चा रंगली.
बागपत जिल्हा रुग्णालयाचे सीएमएस डॉ. अनुराग वाश्नी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बरौत सीएचसी येथून दोन रुग्णांना आणण्यात आलं आहे. दोघांचीही प्रकृती इतकी वाईट होती की प्राथमिक उपचारानंतर त्यांना ताबडतोब मेरठला रेफर करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितलं की, दोघांनीही विष प्राशन केलं होतं की कोणीतरी त्यांना विष दिलं होतं हे स्पष्ट झालेलं नाही. परंतु मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू झाल्यावर दोघांचाही मृत्यू झाला.