वडील मौलवी, मुलगा पुजारी; कृष्णा बनून मंदिरात पूजा करायचा कासिम, लोकांना संशय आला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 17:13 IST2025-07-24T17:12:15+5:302025-07-24T17:13:07+5:30
बिहारमधील एका मौलवीचा मुलगा मोहम्मद कासिम हा कृष्ण असं नाव असल्याचं खोटं सांगून मंदिरात राहत होता तसेच पूजा करत होता.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील एका मौलवीचा मुलगा मोहम्मद कासिम हा कृष्ण असं नाव असल्याचं खोटं सांगून मंदिरात राहत होता तसेच पूजा करत होता. मंदिर परिसरात एक वर्षापासून ओळख लपवून राहणाऱ्या या तरुणाबाबत काही लोकांना संशय आला. त्यानंतर हा धक्कादायक खुलासा झाला. पोलिसांनी कासिमला अटक केली आहे.
गावातील काही लोकांना कासिमच्या वागण्यावर संशय आल्याने त्याच्याकडे ओळखपत्र मागण्यात आलं. पण त्याने ते दाखवलं नाही. नंतर तो काही काळ गावातून गायब झाला. काही दिवसांनी अचानक मंदिरात परत आला आणि तिथे राहू लागला. मिळालेल्या माहितीनुसार, मेरठच्या दौराला पोलीस स्टेशन परिसरातील दादरी गावात असलेल्या एका प्राचीन शिव मंदिरात पुजारी नव्हता.
वर्षापूर्वी एक तरुण गावात आला आणि कृष्ण असं नाव असल्याचं सांगून मंदिरात राहण्याची परवानगी मागितली. मंदिराची देखभाल करणारं कोणीही नसल्याने गावकऱ्यांना कोणताही आक्षेप नव्हता. तरुणाने मंदिरात राहून पूजा करायला सुरुवात केली. हळूहळू स्थानिक ग्रामस्थांचा विश्वासही मिळवला. तो सकाळ-संध्याकाळ पूजा, प्रसाद वाटप, हवन यासारख्या धार्मिक कार्यात सक्रिय भूमिका बजावत असे. याशिवाय भविष्य देखील सांगू लागला.
काही काळानंतर गावातील काही लोकांना त्याच्या भाषेत, वागण्यात काहीतरी वेगळं दिसलं. जेव्हा ओळखपत्र मागितलं तेव्हा तो पळून जाऊ लागला आणि आधार कार्ड आणण्याच्या बहाण्याने १५ दिवस गायब झाला. यामुळे गावकऱ्यांचा संशय आणखी वाढला. काही दिवसांनी तो पुन्हा मंदिरात येऊन राहू लागला.
पोलिसांनी तरुणाची कसून चौकशी केली. सुरुवातीला काहीच सांगितलं नाही. पण नंतर त्याने आपलं नाव मोहम्मद कासिम असल्याचं सांगितलं आणि तो मूळचा बिहारचा असल्याचं मान्य केलं. इतकंच नाही तर त्याने त्याच्या वडिलांचं नाव अब्बास असल्याचं सांगून ते बिहारमध्ये मौलवी असल्याचं म्हटलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासिम अनेक महिन्यांपासून मंदिरात राहत होता आणि मंदिरातील देणगीची रक्कम त्याच्या स्वत:साठी वापरत होता.