नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 10:53 IST2025-12-21T10:52:36+5:302025-12-21T10:53:30+5:30
नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. विम्याचे पैसे हडपण्यासाठी मुलांनी आपल्याच वडिलांची हत्या केली.

AI फोटो
तमिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यातून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. विम्याचे पैसे हडपण्यासाठी मुलांनी आपल्याच वडिलांची हत्या केली. ही घटना जिल्ह्यातील पोथत्तुरपेट परिसरातील आहे. नल्लथिनिरकुलम स्ट्रीट येथे राहणारे ५६ वर्षीय गणेशन हे एका शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत होते, यांचा २२ ऑक्टोबर रोजी सकाळी घरात असताना साप चावल्याने मृत्यू झाला होता.
मुलाने या घटनेची माहिती पोथत्तुरपेट पोलिसांना दिली होती, ज्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान नातेवाईकांनी गणेशन यांच्या नावावर असलेल्या सुमारे तीन कोटी रुपयांच्या विमा पॉलिसींचा क्लेम केला. मात्र, कुटुंबातील सदस्यांच्या जबाबांमध्ये तफावत आढळून आल्याने विमा कंपनीला देखील संशय आला. यानंतर कंपनीने उत्तर विभागाचे आयजी असरा गर्ग यांच्याकडे तक्रार नोंदवली.
विशेष तपास पथकाने जेव्हा या प्रकरणाचा सखोल तपास केला, तेव्हा संपूर्ण कट उघडकीस आला. पोलीस तपासात समोर आलं की, गणेशन् यांच्या नावावर अनेक महागड्या विमा पॉलिसी होत्या. याच पॉलिसींची रक्कम मिळवण्यासाठी त्यांची मुलं मोहनराज आणि हरिहरन यांनी त्यांचे साथीदार बालाजी (२८), प्रशांत (३५), नवीन कुमार (२८) आणि दिनकरन (२८) यांच्यासोबत मिळून हा भयानक कट रचला होता. तपासात असंही समोर आलं की, गणेशन यांचा मृत्यू होण्याच्या एक आठवडा आधी त्यांना एक कोब्रा साप चावला होता. त्यावेळी शेजाऱ्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेल्यामुळे त्यांचा जीव वाचला होता.
पुन्हा साप चावल्यानंतर कुटुंबीयांनी जाणूनबुजून उपचारात विलंब केला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. कॉल डिटेल रेकॉर्ड्सच्या तपासणीत समोर आलं की, मुलांनी मित्रांच्या माध्यमातून सापाची व्यवस्था केली होती, तेव्हा पोलिसांचा संशय अधिक बळावला. याच कटाचा भाग म्हणून वडिलांना दोनदा सापला चावला, जेणेकरून त्यांच्या मृत्यूनंतर विम्याची मोठी रक्कम मिळवता येईल.सध्या पोलिसांनी दोन्ही मुलांसह एकूण सहा आरोपींना अटक केली आहे.