बापाचा अल्पवयीन मुलीशी लैंगिक गैरवर्तनाचा प्रयत्न, माहिती लपवल्याने आजी, आत्यावरही गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 22:03 IST2021-01-13T22:02:20+5:302021-01-13T22:03:01+5:30
Crime News : बापानेच अल्पवयीन मुलीचे कपडे काढून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना २८ मे २०१९ पूर्वी राजापेठ ठाणे हद्दीत घडली.

बापाचा अल्पवयीन मुलीशी लैंगिक गैरवर्तनाचा प्रयत्न, माहिती लपवल्याने आजी, आत्यावरही गुन्हा
अमरावती - बापानेच अल्पवयीन मुलीचे कपडे काढून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना २८ मे २०१९ पूर्वी राजापेठ ठाणे हद्दीत घडली. मुलीने आईला सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. गैरवर्तनाबाबत पीडिताची आजी व आत्याला माहिती असतानाही त्यांनी ती दडवून ठेवली. कुठेही वाच्यता करू नको, अशी धमकीसुद्धा दिल्यामुळे याप्रकरणी पीडितेची आजी व आत्याविरुद्धही पोलिसांनी गुन्हा नोंदवून ताब्यात घेतले. आरोपी पसार झाला आहे.
पोलीससूत्रानुसार, ४२ वर्षीय बापाने १२ वर्षीय मुलीशी लैंगिक गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. आईच्या तक्रारीवरून आरोपी वडील, पीडिताची आजी व आत्याविरुद्ध पोलिसांनी मंगळवारी रात्री भादंविचे कलम ३७६(२), (फ), आय) (जे) ३७६ (अ, ब), २०२,५०६ ब, सहकलम ४,६,८,१२ पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविला. पती-पत्नीचे पटत नसल्याने पत्नी माहेरी राहते, तर पती आई व बहिणीसोबत राहतो. घटनेच्या दिवशी मुलगी आजीकडे आली असता, आरोपीने तिचे कपडे काढून लैंगिक गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मुलीने ही माहिती तिच्या आईला सांगितली. त्यामुळे त्याचे बिंग फुटले. पीडितेच्या ६५ वर्षीय आजीला व ३५ वर्षीय आत्याला याची कल्पना असताना त्यांनी ही माहिती दडवून ठेवल्याने त्यांनाही प्रकरणात आरोपी करण्यात आले.