पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 14:13 IST2025-04-27T14:12:56+5:302025-04-27T14:13:46+5:30
मोनाचं राहुल मिश्रा नावाच्या तरुणाशी लग्न झालं होतं.

फोटो - आजतक
दिल्लीतील रहिवासी असलेल्या मोनाचा फरीदाबादमधील सेक्टर ४८ मध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. मोनाचं राहुल मिश्रा नावाच्या तरुणाशी लग्न झालं होतं. याच दरम्यान मोनाच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केला आहे. मोनाला आधी हुंड्यासाठी मारहाण करण्यात आली आणि नंतर गळा दाबून तिची हत्या करण्यात आली असं म्हटलं आहे.
मोनाची बहीण प्रीतीने दिलेल्या माहितीनुसार, मोना ही तिची सर्वात धाकटी बहीण होती. तिचं लग्न थाटामाटात पार पडावं यासाठी भावाने आमचं घरही विकलं. हुंड्यात कार, ५ लाख रुपये रोख आणि इतर वस्तू देण्यात आल्या. दुसरी बहीण मीनाक्षीने सांगितलं की, सासरचे लोक वारंवार पैशाची मागणी करत होते आणि जमीन खरेदीच्या नावाखाली त्यांच्यावर दबाव आणत होते.
कुटुंबाचा आरोप आहे की, जेव्हा त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तेव्हा मोनाची हत्या तिचा पती राहुल मिश्रा आणि तिच्या सासरच्या लोकांनी केली. कुटुंबीयांचा आरोप आहे की, मोनाच्या मृत्यूनंतरही थेट कोणतीही माहिती देण्यात आली नाही, उलट तिची प्रकृती बिघडली आहे अशी माहिती एका मध्यस्थामार्फत देण्यात आली.
तपास अधिकारी राम बाबू यांनी मृताच्या कुटुंबीयांच्या जबाबाच्या आधारे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती राहुल मिश्राला अटक करण्यात आली आहे आणि चौकशी सुरू आहे. तपासात जे काही तथ्य समोर येईल त्याच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. मुलीच्या हत्येतील इतर आरोपींना लवकरात लवकर अटक करावी असं मोनाच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.