बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 19:10 IST2025-10-19T19:10:03+5:302025-10-19T19:10:36+5:30
ED Fake passport: ईडीने पश्चिम बंगालमधून चालणाऱ्या मोठ्या बनावट पासपोर्ट रॅकेटचा भांडाफोड झाला आहे.

बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
ED Fake passport: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पश्चिम बंगालमध्ये एका मोठ्या बनावट पासपोर्ट रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटच्या माध्यमातून सुमारे ४०० बांग्लादेशी घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवले, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात पाकिस्तानी नागरिक आजाद मलिक आणि त्याचा साथीदार इंदुभूषण हलदार हे दोघे मुख्य आरोपी असल्याचं ईडीने स्पष्ट केलं आहे. दोघेही हवाला व्यवहार आणि बनावट ओळखपत्र तयार करण्याच्या रॅकेटमध्ये गुंतले होते. हे रॅकेट नदिया जिल्ह्यातील चकदाहा शहरात सुरू होते.
इंदुभूषण हलदारला अलीकडेच अटक करण्यात आली असून, त्याने चौकशीत कबूल केलं की, तो पाकिस्तानी नागरिक आजाद मलिकचा जवळचा सहकारी होता. आजाद मलिकने बनावट भारतीय ओळखपत्राच्या नागरिकत्व मिळवलं. त्यानंतर कोलकात्यातील एका भाड्याच्या घरातून त्याने हवाला व्यवहार आणि बनावट पासपोर्ट बनवण्याचं रॅकेट चालवलं.
२ कोटींच्या वरचा हवाला व्यवहार
ईडीच्या तपासात आतापर्यंत २ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आर्थिक व्यवहार झाल्याचं उघड झालं आहे. हे सर्व व्यवहार इंदुभूषण हलदारमार्फतच पार पाडले गेले, असा आरोप आहे. इंदुभूषणने एका मध्यस्त्याच्या घरातून सायबर कॅफे आणि संगणक उपकरणं भाड्याने घेऊन, बनावट कागदपत्रांच्या आधारे ३०० हून अधिक पासपोर्ट तयार केले. ईडीने त्याला शनिवारी न्यायालयात हजर केलं असता, २७ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
बनावट पासपोर्ट कसा तयार करायचे?
तपासात समोर आलं आहे की, रॅकेटमधील लोक आधी बांग्लादेशी नागरिकांसाठी बनावट आधार आणि पॅन कार्ड तयार करायचे. तक्यानंतर त्यांची नावं मतदार यादीत समाविष्ट केली जात. शेवटी बनावट पत्त्यांचा वापर करून पासपोर्ट कार्यालयातून पासपोर्ट मिळवले जात.
पाकिस्तानी लिंकची चौकशी सुरू
पोस्ट विभागातील काही कर्मचार्यांचीही या रॅकेटमध्ये संगनमत असल्याचा संशय आहे. प्रत्येक बनावट पासपोर्टसाठी सुमारे पाच लाख रुपयांची मागणी केली जात होती. ईडी अधिकाऱ्यांच्या संशयानुसार, आजाद मलिकप्रमाणेच आणखी सात पाकिस्तानी नागरिकांनी बांग्लादेशमार्गे भारतात प्रवेश करून भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा संशय आहे. या सर्वांचा तपास सध्या सुरू असून, ईडीकडून अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे.