चोरीला गेलेल्या माबाईलमुळे बनावट कॉल सेंटरच बिंग फुटलं; मोठा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 15:09 IST2022-01-15T15:05:27+5:302022-01-15T15:09:16+5:30
आरोपींकडून २ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीला गेलेल्या मोबाइलच्या माध्यमातून पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.

चोरीला गेलेल्या माबाईलमुळे बनावट कॉल सेंटरच बिंग फुटलं; मोठा मुद्देमाल जप्त
ठाणे- परदेशातून आलेले कॉल्स भारतीय नंबर्सवर वळती करून शासनाचा महसूल बुडवून बनावट कॉल सेंटर चालविणाऱ्या टोळीचा चितळसर पोलीसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडून २ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीला गेलेल्या मोबाइलच्या माध्यमातून पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.
चितळसर पोलीस ठाण्यात मोबाइल चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार या मोबाइलचा शोध पोलिसांनी सुरु केला. हा शोध सुरु असतांना, गणोश बिल्डींग, न्यु टावरे कंपाऊंड, नारपोली, भिवंडी येथे जावून शोध घेत असतांना तेथील मोबाईल शॉपमधील इसमांच्या संशयास्पद हालचालींवरून दोन पंचांसमक्ष गाळ्याची झडती घेण्यात आली त्यात 3 सिमबॉक्स, 195 एअरटेल कंपनीचे सिमकार्ड, वायफाय राऊटर, २ यु.पी.एस., १ एच.पी.कंपनीचा लॅपटॉप, असा एकूण २ लाख ५७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
यानंतर, शॉपमधील संबंधित कर्मचाऱ्याकडे पोलिसांनी अधिक तपास केला असता, नमुद सिमबॉक्स व वायफाय राऊटरच्या माध्यमातून परदेशातून आलेले कॉल्स भारतीय नंबर्सवर वळती करून शासनाचा महसुल बुडवून बनावट कॉल सेंटर चालवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी शोएब अखिल अन्सारी (२४) व्यवसाय, ड्रायव्हर रा. गौरीपाडा, भिवंडी व मोमीन ताह इम्तीयाज मोमीन (१९) रा. गौरीपाडा, भिवंडी यांच्या विरुध्द भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच चितळसर पोलीस ठाण्याने दिलेल्या तक्रारीवरून भारतीय टेलीग्राम कायदा १९८५ चे कलम ४, २०,२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात असून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी दिली.