भयानक! अल्पवयीन मुलीच्या शरीरावर दिले अगरबत्तीने चटके, भोंदूबाबाला ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 20:38 IST2022-04-04T20:32:16+5:302022-04-04T20:38:55+5:30
Superstition Case : झारखंडच्या चतरा जिल्ह्यात १४ वर्षांच्या मुलीला मारहाण केल्याप्रकरणी आणि “दुष्ट आत्म्यांपासून दूर राहण्यासाठी” तिला अगरबत्तीने चटके दिल्याच्या आरोपाखाली एका भोंदूबाबाला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी रविवारी सांगितले.

भयानक! अल्पवयीन मुलीच्या शरीरावर दिले अगरबत्तीने चटके, भोंदूबाबाला ठोकल्या बेड्या
भूतबाधा झाल्याचा बनाव करून एका भोंदूबाबाने १४ वर्षाय मुलीचा शारीरिक छळ केल्याची भयानक घटना समोर आली आहे. त्याने तिच्या संपूर्ण शरीरावर अगरबत्तीचे चटके दिले गेले. झारखंडच्या चतरा जिल्ह्यात १४ वर्षांच्या मुलीला मारहाण केल्याप्रकरणी आणि “दुष्ट आत्म्यांपासून दूर राहण्यासाठी” तिला अगरबत्तीने चटके दिल्याच्या आरोपाखाली एका भोंदूबाबाला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी रविवारी सांगितले.
झारखंडमधील चतरा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. होळी खेळल्यानंतर मुलगी आजारी पडली. त्यानंतर रुग्णालयात नेऊनही तिचा ताप उतरत नव्हता. म्हणून तिला भूतबाधा झाल्याचा संशय तिच्या कुटुंबीयांना आला. त्यानतंर तिला वाहिद (३५) या भोंदूबाबाकडे नेण्यात आले. तुमच्या मुलीला भूतबाधा झाली असून दोन ते तीन दिवसात ती ठणठणीत बरी होईल, असं भोंदूबाबाने तिच्या कुटुंबीयांसोबत बतावणी केली. त्यांनी देखील या भोंदूबाबाच्या भोंदूगिरीवर विश्वास ठेवला. नंतर भोंदूबाबाने सतत चार दिवस मुलीचा शारीरिक छळ केला. तिला मारहाण करण्यात आली. तसेच तिच्या चेहरा, ओठ, हातावर अगरबत्तीचे चटके देण्यात आले. त्यानंतर मुलीची मानसिक स्थिती बिघडली.
मुलीची तब्येत आणखी खालावल्याने तिला सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती अधिक गंभीर झाली. त्यामुळे तिला रांची येथील राजेंद्र रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी भोंदूबाबाविरोधात लावलाँग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार आरोपी वाहिदवर पॉक्सो कायदा आणि खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच त्याला अटक करण्यात आली, असे पोलीस अधीक्षक राकेश रंजन यांनी सांगितले.