आर्थिक राजधानीतही ‘ती’चा छळ थांबेना, जाच काही संपेना; ९ महिन्यांत २१ जणींनी संपविले आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 07:38 IST2025-11-27T07:34:17+5:302025-11-27T07:38:24+5:30
सासरच्या मानसिक, शारीरिक जाच प्रकरणी ४०५ गुन्हे नोंद झाले असून, त्यापैकी ३७३ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

आर्थिक राजधानीतही ‘ती’चा छळ थांबेना, जाच काही संपेना; ९ महिन्यांत २१ जणींनी संपविले आयुष्य
मुंबई - लग्नानंतर अवघ्या ९ महिन्यांत डॉ. गौरी पालवेने पतीच्या विवाहबाह्य संबंध आणि जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरातील वाढत्या महिलाविरोधी गुन्ह्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या ९ महिन्यांत मुंबईत २१ जणींनी आत्महत्या केल्या, तर ५ जणींचा हुंड्यासाठी बळी गेला आहे. मानसिक, शारीरिक अत्याचाराचे ४०५ गुन्हे नोंद झाल्याचे समोर आले आहे.
मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, यावर्षी सप्टेंबरपर्यंत ५,२८४ गुन्हे नोंद झाले. गेल्यावर्षी ही संख्या ४,७८८ होती. त्यावरून यावर्षी सुमारे ५०० गुन्ह्यांची भर पडल्याचे स्पष्ट होते. सासरच्या मानसिक, शारीरिक जाच प्रकरणी ४०५ गुन्हे नोंद झाले असून, त्यापैकी ३७३ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. तर, अन्य कारणाने मानसिक छळाचे ३५४ गुन्ह्यांची नोंद पोलिस दप्तरी झाली आहे. हुंड्यासाठीच्या जाचाला कंटाळून ७ विवाहितांनी आयुष्य संपविले. तर, अन्य कारणांनी १४ जणींनी आत्महत्या केली.
गेल्या दीड वर्षात सुमारे ३,७०० विनयभंगाचे गुन्हे नोंद झाले आहेत. गेल्यावर्षी आणि यावर्षी विनयभंगाच्या गुन्ह्यांची संख्या समान आहे. मात्र बलात्कार, अपहरण, हुंड्यासाठी छळ आदी गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसते. एनसीआरबीच्या ताज्या अहवालानुसार २०२३ मध्ये देशभरात ४.४८ लाख महिलांविरोधी गुन्हे घडले. त्यात ४.५९ लाख महिला बळी ठरल्या. यातील ४७,१०१ गुन्हे अर्थात १०.५० टक्के गुन्हे महाराष्ट्रात घडले आहेत. त्यात ४५,८२७ महिला बळीत ठरल्या. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये १,७७० गुन्हे वाढल्याचे या अहवालात नमूद आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरदिवशी सरासरी १३२ महिला बळी ठरत आहेत.