मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नगररचना विभागातून आरटीआयअंतर्गत कागदोपत्री माहिती देण्यासाठी तक्रारदाराकडून लाच मागितल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लिपिकाला शुक्रवारी अटक केली.एका विकासकाच्या नवीन सर्व्हे क्रमांक ५ (जुना १७३) वर झालेल्या बांधकामाची माहिती आरटीआय कार्यकर्ते गणेश दिघे यांनी नगररचना विभागाकडे मागितली होती. या माहितीत काहीतरी काळेबेरे असल्याने विभागातील लिपिक प्रशांत कोळी यांच्याकडे आरटीआयचा अर्ज आला होता. त्याने दिघे याला कागदोपत्री माहिती देण्यासाठी त्याच्याकडे एक हजाराची लाच मागितली.त्याची तक्रार दिघे याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार, मीरा रोड येथील कनाकिया परिसरात असलेल्या नगररचना विभागात सापळा लावला. त्यावेळी तक्रारदाराकडून लाच घेताना अटक केली. मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने पालिका वर्तुळात खळबळ उडाली असून याचीच चर्चा दिवसभर सुरू होती.
लाच घेताना कर्मचाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 03:03 IST