पत्नीच्या हातात-पायाला इलेक्ट्रिक वायर गुंडाळल्या अन्...; अनैतिक संबंधाच्या संशयाने पती बनला हैवान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 09:12 IST2026-01-03T09:04:50+5:302026-01-03T09:12:48+5:30
आपल्या पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका नराधम पतीने तिचा झोपेतच विजेचा झटका देऊन खून केला.

पत्नीच्या हातात-पायाला इलेक्ट्रिक वायर गुंडाळल्या अन्...; अनैतिक संबंधाच्या संशयाने पती बनला हैवान!
संशय माणसाचा विनाश करतो, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यातून समोर आली आहे. आपल्या पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका नराधम पतीने तिचा झोपेतच विजेचा झटका देऊन खून केला. विशेष म्हणजे, हा खून केल्यानंतर त्याने पत्नीचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवून सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सासरच्या मंडळींच्या एका संशयाने या क्रूर हत्येचा पर्दाफाश केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
वेल्लोर जिल्ह्यातील कट्टुक्कोलाई गावात राहणाऱ्या करुणाकरण याचा विवाह १४ वर्षांपूर्वी कलाईअरासी (३३) हिच्यासोबत झाला होता. या दांपत्याला तीन मुलेही आहेत. सुखाचा संसार सुरू असतानाच गेल्या काही दिवसांपासून करुणाकरणला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. कलाईअरासीचे कोणाशी तरी प्रेमसंबंध आहेत, या विचाराने करुणाकरण पछाडला होता. यातूनच त्याने पत्नीचा काटा काढण्याचा क्रूर कट रचला.
असा दिला मृत्यूचा झटका
बुधवारी रात्री सर्वजण झोपल्यानंतर करुणाकरणने आपली भयंकर योजना अंमलात आणली. कलाईअरासी गाढ झोपेत असताना त्याने अतिशय सावधपणे तिच्या हातांना आणि पायांना विजेच्या उघड्या तारा बांधल्या. त्यानंतर विजेचा स्विच चालू करून तिला जोरदार करंट दिला. विजेच्या तीव्र धक्क्याने जागीच कलाईअरासीचा तडफडून मृत्यू झाला. पत्नीचा जीव गेल्याची खात्री पटल्यानंतर त्याने सर्व तारा काढून पुरावे नष्ट केले.
नैसर्गिक मृत्यूचा बनाव फसला
दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी ७ वाजता करुणाकरणने स्वतःहून आरडाओरडा सुरू केला. "कलाईअरासी झोपेतून उठत नाहीये, तिचा मृत्यू झाला असावा," असे सांगत त्याने आपल्या वडिलांना आणि सासरच्या मंडळींना बोलावून घेतले. सुरुवातीला सर्वांना वाटले की तिला हृदयविकाराचा झटका आला असावा. मात्र, कलाईअरासीच्या आई-वडिलांना आपल्या जावयावर संशय आला. त्यांनी तातडीने पल्लीकोंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसी खाक्या दाखवताच पोपटासारखा बोलला!
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि करुणाकरणला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सुरुवातीला तो मला काहीच माहित नाही, असे म्हणत रडण्याचे नाटक करत होता. मात्र, रात्रभर चाललेल्या कडक चौकशीनंतर करुणाकरण घाबरला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पत्नीच्या वागण्यावर संशय असल्याने आपणच तिला विजेचा झटका देऊन मारल्याचे त्याने मान्य केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात असून, तीन मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.