विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 12:15 IST2025-07-18T12:15:10+5:302025-07-18T12:15:25+5:30
मनीषाने सासरच्या छळाला कंटाळून आपलं जीवन संपवलं. मात्र, मृत्यूपूर्वी तिने बनवलेला एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्याला हादरवणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. छपरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रठौंडा गावात हुंड्यासाठी सासरच्यांकडून झालेल्या छळाला कंटाळून मनीषा या नवविवाहितेने आत्महत्या केली आहे. पण या घटनेनंतर जो खुलासा झाला आहे, तो ऐकून संपूर्ण समाज सुन्न झाला आहे. मनीषाने मंगळवारी रात्री विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं. मात्र, मृत्यूपूर्वी तिने बनवलेला एक व्हिडीओ आता समोर आला आहे, ज्यात ती रडत रडत आपल्यावर झालेल्या अत्याचाराची भयानक कहाणी कॅमेऱ्यासमोर मांडताना दिसली आहे.
थार गाडी मागितली, करंट लावून मारण्याचा प्रयत्न केला!
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मनीषा स्पष्टपणे सांगत आहे की, तिचा पती कुंदन, सासू-सासरे आणि दीर तिला सतत हुंड्यासाठी त्रास देत होते. त्यांनी फक्त मारहाणच केली नाही, तर गर्भवती असताना तिचा जबरदस्तीने गर्भपातही करवला. मनीषाने व्हिडीओमध्ये सांगितलं की, तिच्याकडून वारंवार थार गाडी आणि रोख पैशांची मागणी केली जात होती.
"माझ्या वडिलांनी लग्नात २० लाख रुपये खर्च केले, बुलेट गाडीही दिली," असंही तिने व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. जेव्हा ती या मागण्या पूर्ण करू शकली नाही, तेव्हा तिला करंट लावून मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता, असा गंभीर आरोप तिने केला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या प्रकरणाने नवं वळण घेतलं आहे.
शरीरावरच लिहिली होती सुसाईड नोट
याआधी बुधवारी एक आणखी धक्कादायक बातमी समोर आली होती. मनीषाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या हात, पाय आणि पोटावर मार्कर पेनने सुसाईड नोट लिहिली होती. त्यात तिने स्पष्टपणे म्हटलं होतं की, "माझ्या मृत्यूला कुंदन आणि त्याचं कुटुंब जबाबदार आहे." घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि नंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
दोषींना शिक्षा होणार?
मनीषाच्या भावाने, रितिकने, तिचा पती कुंदन, सासू-सासरे आणि दोन दीर यांच्याविरोधात छपरौली पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली तक्रार दाखल केली आहे. बागपतचे पोलीस अधीक्षक सूरज कुमार राय यांनी या प्रकरणी माहिती देताना सांगितलं की, "प्राथमिक तपासात हे आत्महत्येचं प्रकरण वाटत आहे. मृतदेहावर लिहिलेली सुसाईड नोट आणि व्हिडीओचा तपास केला जात आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला जात आहे आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे."
२०२३ मध्ये झालं होतं लग्न, जुलै २०२४ पासून छळ वाढला
मनीषाचं लग्न २०२३ मध्ये नोएडाच्या सिद्धिपूर गावच्या कुंदनसोबत झालं होतं. लग्नानंतर काही महिन्यांतच सासरच्या लोकांनी तिच्यावर हुंड्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली होती. जुलै २०२४ मध्ये तिच्या वडिलांनी तिला सासरहून माहेरी आणलं होतं. चार दिवसांपूर्वी दोन्ही बाजूंमध्ये संबंध तोडण्याबाबत बोलणी झाली होती. मात्र, मनीषाने स्पष्ट सांगितलं होतं की, जोपर्यंत हुंड्याचं सामान आणि लग्नाचा खर्च परत मिळत नाही, तोपर्यंत ती घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करणार नाही.