Eknath Shinde Duplicate: एकनाथ शिंदेंच्या डुप्लिकेटवर पुणे पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 20:14 IST2022-09-19T20:14:16+5:302022-09-19T20:14:49+5:30
विजय माने हा नियमितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा व पोषाख करुन समाजात वेगवेगळ्या कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी जाऊन लोकांचा गैरसमज व्हावा, अशा पद्धतीने वावरत असतो. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तो जरा जास्तच प्रकाशझोतात आला आहे.

Eknath Shinde Duplicate: एकनाथ शिंदेंच्या डुप्लिकेटवर पुणे पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा दिसत असल्याने पुण्यात हवा करत असलेल्या तरुणावर पुणेपोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विजय नंदकुमार माने याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माने याने चेहऱ्यावर वाढवलेली दाढी, कपाळावरचा टिळा आणि परिधान केलेलं व्हाईट शर्ट आणि व्हाईट पॅन्ट यामुळे ते शिंदे यांच्यासारखेच दिसत आहेत. त्याचे फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होते. आताही त्याने शिंदेंसारखाच पोशाख परिधान करून सऱ्हाईत गुन्हेगार शरद मोहोळ सोबत फोटो सेशन केले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.
व्हॉटसॲप व फेसबुक या सोशल मीडियावर अधिक माहिती घेतल्यावर पोलिसांना एक फोटो मिळाला. फोटो पाहिल्यावर सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे असून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ हा खुर्चीत बसला असल्याचे दिसत आहे. फोटो नीट पाहिल्यावर तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नसून तो विजय माने याचा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक माेहन जाधव यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विजय माने हा नियमितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा व पोषाख करुन समाजात वेगवेगळ्या कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी जाऊन लोकांचा गैरसमज व्हावा, अशा पद्धतीने वावरत होता. लोकांची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न विजय माने व इतरांनी करुन मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी सराईत गुन्हेगारासोबत फोटो सोशल मीडियात व्हायरल करुन गैरसमज पसरविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बंडगार्डन पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे अधिक तपास करीत आहेत.