झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 12:06 IST2025-07-21T12:05:54+5:302025-07-21T12:06:57+5:30
करण देवची पत्नी सुष्मिता आणि तिचा बॉयफ्रेंड राहुल (करणचा चुलत भाऊ) यांनी त्याला मारण्याचा भयंकर कट रचला होता.

झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
दिल्लीच्या द्वारका परिसरात एका भयंकर घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे, एका पत्नीने तिच्याच पतीची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३६ वर्षीय करण देवची पत्नी सुष्मिता आणि तिचा बॉयफ्रेंड राहुल यांनी त्याला मारण्याचा भयंकर कट रचला होता.
१३ जुलै रोजी रुग्णालयातून पीसीआरला करणच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. आता करणच्या कुटुंबाने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत लवकर न्याय मिळावा अशी विनंती केली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे आणि तपास सुरू आहे.
करणचा सख्खा भाऊ कुणाल याला सर्वात आधी काहीतरी कट असल्याचा संशय येत होता. त्याने सुष्मिता आणि राहुलमधील चॅट पाहिलं ज्यामध्ये करणला मारण्याबाबत चर्चा होती. चौकशीदरम्यान सुष्मिताने कबूल केलं की तिने करणला दही आणि पाण्यात मिसळून झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या.
कुणालने सांगितलं की, घटनेच्या दिवशी सुष्मिता रडत घरी आली आणि करणला शॉक लागल्याचं सांगितलं. त्यांनी करणला रुग्णालयात नेलं, पण तिने शवविच्छेदन न करण्याचा हट्ट धरला, ज्यामुळे कुटुंबाला आणखी संशय आला. यानंतर राहुलचा मोबाईल तपासला तेव्हा हत्येचा उघड झाला. चॅट वाचल्यानंतर पोलिसांना याबाबत लगेचच माहिती देण्यात आली.
झोपेच्या गोळ्या देऊनही करणचा मृत्यू झाला नाही तेव्हा राहुलने पुढील प्लॅन केला. त्याने एक विजेची तार घेतली आणि ती करणच्या हातावर आणि हृदयाजवळ लावली. यामुळे करणला जोरात शॉक बसला आणि त्याचा मृत्यू झाला.
कुणालने एक व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला ज्यामध्ये सुष्मिताने तिचा गुन्हा कबूल केला. त्यावेळी तिचा सहा वर्षांचा मुलगा घरी नव्हता. कुणालने असाही आरोप केला की त्याला राहुलच्या वडिलांकडून धमक्या येत होत्या. करण आणि सुष्मिता यांचं १० वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आणि ते अलीकडेच भाड्याच्या घरात राहू लागले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.