रजेवर असूनही पोलिसाने बजावले कर्तव्य; पत्नीसोबत असतानाही केला सोनसाखळी चोरांचा पाठलाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 21:08 IST2020-10-13T21:04:20+5:302020-10-13T21:08:07+5:30
Crime News : सिन्नर ओलांडल्यानंतर मोहदरी घाटात दोघा चोरांना पकडण्यास त्यांना यश आले.

रजेवर असूनही पोलिसाने बजावले कर्तव्य; पत्नीसोबत असतानाही केला सोनसाखळी चोरांचा पाठलाग
नाशिक : गुन्हे शाखेच्या युनिट-2मध्ये कार्यरत असलेले गुलाब सोनार हे त्यांच्या पत्नीसोबत संगमनेरकडून नाशिकला येत असताना रस्त्यात त्यांना दोघे सोनसाखळी चोर दुचाकीने सुसाट जाताना दिसले. त्यांना संशय आल्याने सोनार यांनी कुटुंबियांसह पाठलाग सुरु केला. सिन्नर ओलांडल्यानंतर मोहदरी घाटात दोघा चोरांना पकडण्यास त्यांना यश आले.
शहर व परिसरात दररोज सोनसाखळी चोरीच्या घटना मागील आठवडाभरापासून घडत आहेत. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, सोनसाखळी चोरांच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले असले तरी त्यात फारसे यश अद्यापही आलेले नाही. यामुळे पोलिसांच्या कारभारविषयी नागरिकांत काहीं प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सोनार हे रजा घेऊन कौटुंबिक कामासाठी संगमनेरला गेले होते. तेथून ते पत्नीसोबत नाशिकला परतत असताना नांदूरशिंगोटेच्यापुढे काही अंतर आल्यानंतर काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले दोघे युवक दुचाकीने (एम.एच 08 एल पी 5347) सुसाट वेगाने पुढे जात असल्याचे दिसले. सोनार यांनीही आपल्या गाडीचा वेग वाढवून त्यांच्या दुचाकीच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झालेले सोनसाखळी दुचाकी चोर आणि रस्त्यावर दुचाकीने जाणारे हे दोघे एकच असल्याची त्यांना खात्री पटली. सोनार यांनी आपल्या पत्नी व अन्य नातेवाईकाच्या मदतीने दोघा चोरट्याना शिताफीने मोहदरी घाटात ताब्यात घेतले. त्या दोघांची अंगझडती घेतली असता दुचाकी, कोब्रा स्प्रे, धारदार सुरे, फायटर, चार सोनसाखळ्या असा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोघा सराईत गुन्हेगारांकडून शहरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या सोनसाखळ्या चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट श्यक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
सोनार यांच्या कामगिरीचे कौतुक
रजेवर असुनही आपला अनुभव व कौशल्याचा वापर करत सोनसाखळी चोरांना गजाआड करण्याची एकहाती महत्वाची कामगिरी जोखीम पत्करून केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त दीपक पांडेय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी सोनार यांचे अभिनंदन करत कौतुक केले.