चित्रपट निर्माते, बिल्डर एनकुमार यांना महाठगाने घातला सव्वाकोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 21:34 IST2021-09-12T20:54:34+5:302021-09-12T21:34:15+5:30
Fraud Case : ले-आऊट परस्पर विकले; सदरमध्ये गुन्हा दाखल

चित्रपट निर्माते, बिल्डर एनकुमार यांना महाठगाने घातला सव्वाकोटींचा गंडा
नागपूर - कुख्यात ठगबाज गोपाल लक्ष्मण कोंडावार (वय ५९) याने सव्वा कोटींचा गंडा घातल्याची तक्रार बहुचर्चित बिल्डर आणि चित्रपट निर्माते एनकुमार यांनी पोलिसांकडे नोंदवली आहे. शनिवारी या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने सदर पोलीस ठाण्यात कोंडावारविरुद्ध गुन्हा दाखल केला.
एनकुमार उर्फ नंदकुमार खटमल हरचंदानी (वय ६८, रा. बैरामजी टाऊन) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी काही वर्षांपूर्वी माैजा पांजरी लोधी येथील अजय पाटणी यांची तसेच सुकळी येथील अग्रवाल यांची जमीन विकत घेतली होती. त्यात ले-आऊट टाकून एनकुमार यांनी आरोपी गोपाल कोंडावारला ते विकण्यासाठी दिले. कोंडावार त्यावेळी वाशी (नवी मुंबई)च्या रहेजा रेसिडेन्सीमध्ये राहत होता. कोंडावारने या जमिनीवर जगदंब गुलमोहर नावाने नवीन ले-आऊट टाकले आणि तेथील १३४ भूखंड परस्पर विकले. संबंधित कागदपत्रांवर एनकुमार यांच्या बनावट सह्या केल्या आणि त्यांना सुमारे १ कोटी, ३० लाख, ९९,२४३ रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार उघड झाल्यानंतर हरचंदानी यांनी कोंडावारकडे विचारणा केली असता त्याने असंबंद्ध उत्तरेे देऊन त्यांची बोळवण केली. त्यामुळे एनकुमार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. त्यानुसार, आर्थिक गुन्हे शाखेतर्फे प्रकरण तपासात घेण्यात आले. ५ जुलैपासून सुरू असलेल्या या अर्जाची चाैकशी केल्यानंतर शनिवारी सदर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
विशेष म्हणजे, एनकुमार यांचे अनेक मालमत्ता प्रकरणात यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारे नाव आले आहे. आघाडीचा अभिनेता संजय दत्त याची मुख्य भूमीका असलेला वास्तव हा चित्रपट निर्माण केल्यापासून एनकुमार हे नाव सर्वत्र चर्चेला आले होते.
हडपलेली संपत्ती कुठे दडवली ?
कुख्यात कोंडावारने वेगवेगळ्या पद्धतीने नागपूर तसेच बाहेरच्या अनेक लोकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. गेल्या चार महिन्यात त्याच्याविरुद्ध पाच गुन्हे दाखल झाले असून, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने हडपलेली कोट्यवधींची संपत्ती कुठे दडवून ठेवली, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोंडावारने लोकांची फसवणूक करून मुंबई, पुण्यासह विविध महानगरात कोट्यवधींची आलिशान संपत्ती विकत घेऊन ठेवल्याची चर्चा आहे.